Download App

फुटण्यास नकार दिल्यानेच सूरज चव्हाणचा छळ; अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Aaditya Thackeray Speak On Suraj Chavan Arrested : फुटण्यास नकार दिल्यानेच सूरज चव्हाणचा छळ सुरु असल्याचा आरोप सूरज चव्हाण याच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंनी केला आहे. कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल रात्रीच्या सुमारास ईडीकडून ही कारवाई करण्यात आली असून या घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण याच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचं चौकशीत समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणी ईडीकडून चव्हाण याला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकारावर अखेर आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं आहे. यासंदर्भातील ठाकरेंनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

आदित्य ठाकरे पोस्टमध्ये म्हणाले, “निर्लज्ज हुकूमशहा आणि त्यांच्या एजन्सीसमोर न झुकणाऱ्या सहकाऱ्याचा अभिमान वाटतो. सूरज चव्हाण नेहमी सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानासाठी खंबीर उभे राहिलेले आहेत. त्यांनी फुटण्यास नकार दिल्याने त्यांचा छळ केला जात आहे. या काळ्या दिवसांमध्ये आम्ही लोकशाहीसाठी लढू आणि जिंकू. राज्यातील हुकूमशाही संपूर्ण जग पाहत आहे. ठाकरे गटाकडून सूरज चव्हाण यांना पाठिंबा देणार” असं पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

अनेक दिवस चौकशी केल्यानंतर ईडीने काल चव्हाण यांना अटक केली. या कारवाईमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोरोना काळात गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेकडून 52 कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यांत 4 कोटी खिचडीचे पॅकेट वाटप करण्यात आले पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. ईडीने कारवाई करत सूरज चव्हाण यांना अटक केली.

दरम्यान, कोरोना काळात सूरज चव्हाण यांच्या मध्यस्थीने अनेक कंपन्यांना कामे मिळाली, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी कामे मिळवून दिली होती. त्यांच्यावरील या आरोपांची नंतर चौकशी करण्यात आली.

follow us