ADCC Bank Election: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (ADCC Bank Election) बँकेचे संचालक होण्यासाठी अखेरच्या दिवशी भरसाठ अर्ज आले आहेत. तब्बल 363 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सोमवारी अखेरच्या दिवशी माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अक्षय कर्डिले, आमदार विवेक कोल्हे, बिपिन शंकरराव कोल्हे, माजी आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांचे सुपुत्र प्रतापसिंह पाचपुते, शंकरराव गडाख, सचिन जगताप, अमित भांगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी बैठक झाली आहे. या बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजी खासदार व भाजप प्रदेशाध्य उपाध्यक्ष सुजय विखे व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे एकत्र आले होते. त्या बैठकीला अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. परंतु काही जणांना न बोलविल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
नेवाशातून गडाखांचा एकमेव अर्ज
नेवाशा तालुक्यातील सेवा सोयायटी मतदारसंघातून केवळ शंकरराव गडाख यांचा एकमेव उमेदवार अर्ज आला आहेत. त्यामुळे ते बिनविरोध निवडून येणार हे नक्की झाले आहे. तर घुले यांच्या घरातून चंद्रशेखर घुले व त्यांची पत्नी राजश्री घुले यांचे प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही जागा बिनविरोध होणार आहे.
सुजय विखेंविरोधात घोगरे, खर्डे यांचा अर्ज
राहाता तालुक्यातील सेवा सोयायटीच्या मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात दोन जणांनी अर्ज दाखल केले आहे. एकनाथ चंद्रभान घोगरे, भास्कर निवृत्ती खर्डे यांनी उमेदवारी दाखल केले आहेत. दोघेही विखे विरोधक आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे विरोधात काँग्रेस प्रतिभा घोगरे यांना उमेदवारी दिली होती. त्यांचे पती एकनाथ घोगरे यांनी विखेंविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते बाळासाहेब थोरात समर्थक आहेत. थोरातांच्या निर्णयावर विखे हे बिनविरोध होतील. श्रीरामपूर सोसायटी मतदारसंघातून करण ससाणे, रणजित बनकर, सोपानराव राऊत, सोन्याबापू शिंदे असे उमेदवारी अर्ज आले आहेत. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरातून मात्र उमेदवारी अर्ज आलेला आहे.
अक्षय कर्डिलेंविरोधात शेळके, हराळांचा अर्ज
पाथर्डीमध्ये आमदार मोनिका राजळेंविरोधात ऋषिकेश प्रताप ढाकणे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर अहिल्यानगर विकास सोसायटीसाठी प्रताप गंगाधर शेळके, अक्षय शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब हराळ असे तिघांचे अर्ज आहेत. अकोल्यातून सेवा सोसायटी मतदारसंघातून 19 अर्ज आले आहेत. त्यात आमदार किरण लहामटे, सिताराम गायकर हे महत्त्वाचे अर्ज आहेत. कोपरगावमधून आमदार विवेक कोल्हे, बिपीन कोल्हे, संजय शिंदे, अनिल कदम असे अर्ज आले आहेत.
पारनेरमध्ये खासदार, आमदारांचे अर्ज
पारनेर सोसायटी मतदारसंघातून खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, गितांजली शेळके, राहुल शिंदे असे चौघांचे अर्ज आले आहेत.
राहुरीतून कोण संचालक होणार ?
राहुरी तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून आमदार प्राजक्त तनपुरे, हर्ष अरुण तनपुरे आणि सत्यजित कदम असे तिघांचे अर्ज आले आहेत.संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांच्या संबंधित रणजितसिंह देशमुख हे रिंगणात उतरले आहेत. चित्रा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक रस्सीखेच ?
श्रीगोंद्यात माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अर्जना पानसरे, प्रणोती राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, अनुराधा कुंडलिकराव जगताप, प्रवीणकुमार नाहाटा अशा दिग्गजांचे अर्ज आले आहेत. तर माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी बिगरशेती मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. तर स्त्री राखीव मतदारसंघातून तब्बल 30 अर्ज आले आहेत. त्यात कर्जतमधील मंजुषा गुंड, श्रीगोंद्यातील अनुराधाताई नागवडे, अर्जना पानसरे, प्रणोती राहुल जगताप, अनुराधा कुंडलिकराव जगताप यांनीही उमेदवारी दाखल केली आहे.
