Download App

आदित्य ठाकरे ठाण्यातला कोणता मतदारसंघ निवडणार?

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shivsena Thackeray Group Leader)आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी ठाण्यातील (Thane) जनप्रक्षोभ यात्रेत (Janprakshobh Yatra) आपण ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी थेट ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचं भर सभेत सांगितलं आहे. बुधवारी ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshni Shinde)यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या भाषणामध्ये आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे नेमकं कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ठाणे शहरामध्ये आत्ताच्या घडीला ठाणे शहर(Thane city), ओवळा-माजीवडा (Ovala-Majivada)आणि कोपरी-पाचपाखडी (Kopri-Pachakhadi)असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात सद्यस्थितीला दोन मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत तर एका मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये सध्या तरी शिवसेनेचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतंय.

मोठी बातमी! ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 18 मे रोजी मतदान

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. 1990 पासून 2004 पर्यंत या मतदारसंघात मोरेश्नर जोशी आमदार होते. 2004 मध्ये एकनाथ शिंदे हे देखील याच मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते. पुढे मतदारसंघाच्या पुनर्चनेनंतर एकनाथ शिंदेंनी दुसरा मतदारसंघ निवडला. पुढे 2014 च्या विधानसभा जागावाटपावरुन शिवसेना-भाजप युती तुटली होती. त्यामुळे 2014 मध्ये भाजपचे संजय केळकर यांनी बाजी मारली. त्यानंतर पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजनेच बाजी मारली, पण यावेळी शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली आहे. त्याचवेळी या मतदारसंघात मनसेची ताकत वाढल्याचंही दिसून येतंय.

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर 2009 पूर्वी ठाणे आणि बेलापूर हे दोन मोठे विधानसभा मतदारसंघ होते. पुढे 2009 मध्ये दोन्ही मतदारसंघांची पुनर्चना करण्यात आली. त्यातून ओवळा-माजिवडा मतदारसंघ तयार करण्यात आला. तेव्हापासून शिवसेनेचे प्रताप सरनाईक निवडून येत आहेत. असं असलं तरीही या मतदारसंघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचंही तसं पाहिलं तर वजन आहे. या मतदारसंघात यापूर्वीच्या तीन्ही निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनं चांगली मतं गोळा केली होती. त्यामुळं या मतदारसंघातील सहकारी पक्षांच्या मतांचा आदित्य ठाकरेंना थेट फायदा होऊ शकतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ म्हणून कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. ते या मतदारसंघातून 2009 पासून निवडून येत आहेत. ते या मतदारसंघातून तीनदा निवडून आले आहेत. या मतदारसंघात एकनाथ शिंदेंचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढताना दिसून आलं आहे. कारण या मतदारसंघातून निवडणून लढताना प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मतांची गोळाबेरीज वाढत असल्याचं दिसून आलं आहे. असं म्हटलं जातंय की, या मतदारसंघात एकनाथ शिंदेंना राजकीय विरोधकच नाही.

आता या तीन्ही मतदारसंघांचा विचार केला तर आदित्य ठाकरे हे ठाणे शहर मतदारसंघाचा पर्याय निवडण्याची दाट शक्यता आहे. कारण ओवळा-माजिवडा आणि कोपरी-पाचपाखडी या मतदारसंघात शिवसेनेसह आमदार प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आपापलं वजन आहे. त्यामुळं तसं पाहिलं तरं ठाणे शहरात भाजपचा आमदार आहे. मात्र या मतदारसंघात भाजपचं मताधिक्य पाहिलं तर कमी आहे. पण या मतदारसंघात शिवसेनेचा मतदार विचार करु शकतात. त्यामुळे हा मतदारसंघ आदित्य ठाकरे निवडण्याची दाट शक्यता आहे. पण हा फक्त अंदाज आहे. येत्या काळात या सर्व गोष्टी समोर येणार आहेत.

Tags

follow us