Download App

Ahmednagar politics : बाळासाहेब थोरात यांचे भाचे करतात तरी काय?

  • Written By: Last Updated:

अहमदनगरः विधानपरिषदेचा नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) राजकारणातील मोठ्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या पक्षाविरोधातील भूमिकेमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. मात्र यामुळे बाळासाहेब थोरातच अडचणीत सापडले आहेत. यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील राजकारण्यांमधील नातेसंबंधही पुन्हा चर्चेत आले आहेत.

यामध्ये सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या तीन बहिणींचे मुलं राजकारणात सक्रीय आहेत. काही जण स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्षांमध्ये सक्रीय आहेत. बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे हे 2009 मध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार झाले. तर थोरातांची बहीण दुर्गा तांबे सलग 10 वर्षे संगमनेरच्या नगराध्यक्ष राहिल्या आहेत. तर भाचा सत्यजितने युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला.

थोरातांची एक बहिण पाथर्डीतील राजळे कुटुंबात दिलेली आहे. राजळे कुटुंब पहिल्यापासूनच राजकारणात सक्रीय आहे. थोरातांचे दिवंगत भाचे राजीव राजळे हे राजकारणात होते. त्यांनीही अनेक पक्ष बदललेले आहेत. ते काही काळ काँग्रेसचे आमदारही होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभा, लोकसभा लढविली होती. पुढे ते राष्ट्रवादीत गेले, आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवली. तर आता त्यांच्या पत्नी मोनिका राजळे या पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत.
राजळे घरातील त्यांचे दुसरे भाचे राहुल हे स्थानिक राजकारणात आहेत.

नेवाशाचे शंकरराव गडाख हे थोरातांचे भाचेजावई लागतात. ते सध्या ठाकरे गटात आहेत. थोरातांची भाची सुनीता गडाख याही स्थानिक राजकारणात सक्रीय आहेत.थोरातांची तिसरी बहीण राहुरीतील कडू घरात दिलेली आहे. त्यांचे मेहुणे अरुण कडू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. अरूण कडू यांचा मुलगा किरण राष्ट्रवादीमध्येच सक्रीय आहे. नगर जिल्ह्यात ताकद असलेल्या सर्वच वेगवेगळ्या पक्षांमध्ये थोरातांचे भाचे हे सक्रीय असल्याचे दिसून येतात.

Tags

follow us