Raj Thackeray On Karjaat Tree Cutting : कर्जत ते भीमाशंकर जंगलतोडीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्जत दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे यांनी जंगलतोडीची पाहणी केली. पाहणीनंतर राज ठाकरेंनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या भावना समजून घेतल्या. दौऱ्यानंतर घेण्यात आलेल्या जाहीर सभेतून राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राचा दाखल देत सरकारला सवाल केला आहे. शिवछत्रपतींचे विचार तरी सरकार ऐकणार आहे का? असा थेट सवाल करत राज ठाकरेंनी शिवरायांचं आज्ञापत्रच वाचून दाखवलंय.
कर्जतमध्ये एवढा मोठा प्रकल्प उभारला जात असताना त्याची चर्चा ग्रामसभेत झाली का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या प्रकल्पातून तयार होणारी वीज महाराष्ट्राला मिळणार का आणि तिचे वितरण कोणत्या खासगी उद्योगपतीच्या माध्यमातून केले जाणार, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच या सगळ्या लोकांचं लक्ष फक्त एमएमआर परिसरावर आहे. मुंबई गुजरातला मिळवायची ही मनषा त्यामागे आहे, हे त्यांचं दुखणं आहे. उद्या त्यांचेच खासदार, आमदार ते जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत असेल. 2029 साली निवडणुका आहेत. या अडीच तीन वर्षात महाराष्ट्राची काय विल्हेवाट लावतील काय माहिती? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
पंप स्टोरेज प्रकल्पासाठी पाणी उचलण्याकरिता वीज लागते. त्यासाठी वेगळी सौरऊर्जा निर्माण केली आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. महाराष्ट्रात येणाऱ्या डेटा सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे. या डेटा सेंटरला वीज पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे का, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, इतका मोठा प्रकल्प उभारताना ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि विधानसभेत चर्चा झाली होती का? झाली असेल तर त्याची माहिती मराठीत उपलब्ध करून दिली आहे का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. कर्जत परिसरातील भीमाशंकर अभयारण्यालगतच्या साई डोंगर परिसरात ‘टॉरेंट पॉवर’च्या वीज प्रकल्पासाठी होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
