नागपूर : आमचं सरकार स्थापन केल्यापासून सरकार घालवण्यासाठी ह्याचं पहिल्या दिवसांपासून काम सुरु झालं होतं. आणि ते करण्यासाठी वेशभूषा बदलून यायचे. आमचं सरकार पडेपर्यत स्वत:च्या तोंडाला कुलुप लावलं होतं. सगळं झाल्यावर म्हणाले मी ह्या फोन करुन सांगितले इकडे जा, त्याला सांगितले मंत्रीपद देतो हे सर्व बोलता बोलता सांगून टाकलं. पण तुमच्या इमेजला ही गोष्ट शोभली नाही.
तुम्ही बदला घेतल्याची भाषा बोलता, ही बदल्याची भाषा उपमुख्यमंत्रीसाहेब तुमच्या तोंडी शोभत नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
देवेंद्रजी तुम्ही पहिल्यांदा अर्थमंत्री झालात. 52 हजार 327 कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या केल्या आहेत. राज्याच्या गेल्या दहा वर्षाच्या इतिहासात कोणीही इतक्या मोठ्या पुरवणी मागण्या केल्या नव्हत्या. तुमची भूमिका असते की आर्थिक शिस्त जपली पाहिजे पण तुम्हीच ही आर्थिक शिस्त मोडली आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
गेल्या सहा महिन्यात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी केलेल्या घोषणा तुम्हाला पूर्ण करता येतील का? याचा विचार सदसद विवेक बुद्धीला स्मरुन एकदा करुन पहा. जाहीर केलेल्या घोषणा एका वर्षात पूर्ण करुन दाखवणार हे एकदा सांगा. तुम्ही म्हणाल त्या गोष्टी मी करेल, असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.