राष्ट्रवादी काँग्रसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे आज पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) येथे होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांच्या मुलाखतीवर भाष्य केले. कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे हे ट्रॅपमध्ये अडकल्याचे म्हटले होते. यावर अजितदादांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याबद्दल तेच सांगू शकतात, मी असे काही म्हटलेले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी ते पिंपरी चिंचवड येथे बोलत होते.
मी म्हटलं का ट्रॅप मध्ये अडकलेत, ते कोश्यारी साहेब म्हटले. त्यामुळे मला माहित नाही ते कशामुळे म्हणाले. शंकेला वाव होईल असं त्यांनी बोलू नये. कोश्यारीजींनी स्पष्ट सांगावं उद्धव ठाकरे कोणाच्या ट्रॅप मध्ये अडकलेत, नाव घ्यायला काय घाबरायचं. म्हणजे त्याबद्दल उत्तर देता येईल, अशा शब्दात त्यांनी कोश्यारींच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याआधी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पिंपरी चिंचवड येथे बोलताना अजित पवारांनी स्वार्थासाठी पहाटे शपथ घेतली होती, असा आरोप केला होता. त्यावर देखील अजितदादांनी भाष्य केले आहे. आठ वाजल्याला तुम्ही जर पहाट म्हणायला लागला तर हे दुर्दैव आहे. तीन वर्षांपूर्वी झालेली ही घटना आहे, ज्याला 1000 दिवस होऊन गेले आहेत. त्यामुळे हजार दिवसांपूर्वी घडलेली घटना आता काढून काय उपयोग आहे?, असे ते म्हणाले आहेत.
तसेच संजय राऊत यांना आलेल्या धमकीच्या प्रश्नावर देखील भाष्य केले आहे. ती धमकी संजय राऊत यांना आलेली आहे. ते राऊत यांना माहिती धमकी कुठून मिळाली ते मला माहिती नाही त्यामुळे जी गोष्ट मला माहिती नाही त्याबद्दल मी उत्तर देणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवडचे माजी महापौर मंगला कदम व योगेश बहल हे फक्त अजितदादा असतानाच प्रचारात दिसतात, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर देखील त्यांनी उत्तर दिले. मी आता त्या दोघांनाही विचारतो की, पत्रकार मला विचारत आहेत की, मी असतानाच तुम्ही येता आणि बाकी वेळी गैरहजर असता याचा मला उत्तर द्या, त्यांच्याकडून उत्तर आलं की मी तुम्हाला देतो, अशा मिश्किल शब्दात त्यांनी उत्तर दिले.