Download App

Letsupp Special : Ajit Pawar यांच्यासोबत किती आमदार? हा आहे आकडा!

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar यांच्या कथित संभाव्य बंडाविषयी सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारण की विनाकारण हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सोळा आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले तर अजित पवार हे भाजपसोबत जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजित पवार यांनी याचा ठाम शब्दांत इन्कार केलेला नाही. कोणतीही बाब स्पष्टपणे सांगण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या अजितदादांनी मिश्र असे संकेत दिले आहेत. उद्या खरोखरीच अजित पवार यांनी बंड केलेच तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे किती आमदार सोबत जातील, याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

अजित पवार यांची त्यासाठी पक्षावरील पकड लक्षात घेतली पाहिजे. राष्ट्रवादीचे विधानसभेत ५३ आमदार आहेत. पक्षात जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे आदी ज्येष्ठ नेते आहेत. त्यातील तटकरे आणि मुंडे हे अजितदादांचा शब्द पाळणारे आहेत. इतर नेते हे शरद पवार यांचा शब्द अंतिम मानतील, अशी स्थिती आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांवर ईडी, सीबीआयचा दबाव आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील कोणी नेता फुटल्यास तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल असे म्हणत पुन्हा संदिग्ध विधान केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात कोणताही नवीन प्रयोग होणार नसल्याचे आजच स्पष्ट केले असले तरी अजित पवारांच्या संभाव्य बंडाची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही.

Letsupp Special : Ajit Pawar यांचा स्पष्टवक्तेपणा अशा वेळी कोठे जातो?

राष्ट्रवादीच्या तरुण आमदारांमध्ये अजितदादांचा शब्द प्रमाण मानला जातो. पुणे, बीड, सातारा या जिल्ह्यांतील एक-दोन अपवाद वगळता राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार हे अजित पवार म्हणतील तिकडे जातील, अशी स्थिती आहे. यात अशोक पवार, सुनील टिंगरे, सुनील शेळके, दत्तात्रेय भरणे, मकरंद पाटील, अतुल बेनके हे अजितदादांसोबत आघाडीवर राहतील. नगर जिल्ह्यातील रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे हे आमदार लगेचच अजित पवारांसोबत पाठीमागे जातीलच, असे सांगता येत नाही. ते शरद पवार यांचा कल कसा आहे, त्यावर निर्णय घेतील. सांगली आणि नाशिकमधील राष्ट्रवादीचे आमदार हे अनुक्रम जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांचा सल्ला घेऊन जातील. पण सिन्नरमधील माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या ज्येष्ठ आमदारांना भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज भासणार नाही. ते अजित पवार म्हणतील तिकडे जातील.कोकणातील आदिती तटकरे या पण दादांप्रमाणे निर्णय घेऊ शकतात. चिपळूणचे आमदार शेखर निकम हे शरद पवार यांच्यासोबत राहू शकतील.

 

राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये पक्षांतरबंदी कायद्यानुसार अधिकृत फूट पडण्यासाठी ३६ आमदारांची गरज भासेल. इतका आकडा अजित पवार जमवू शकतील, असे अनेकांना वाटत नाही. अजित पवारांसोबत जाणाऱ्या आमदारांचा हा आकडा २० ते २५ च्या दरम्यान राहू शकतो. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय अजित पवार हे स्वबळावर घेणार की पक्ष म्हणूनच तो अंतिम निर्णय शरद पवार घेतील, याबाबतही शंका असल्याचे एका नेत्याने सांगितले. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काॅंग्रेस असा कोणताच निर्णय घेणार नाही, या केवळ वावड्या आहेत, असेही हा नेता म्हणाला.

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळी शपथविधी केला. त्यावेळी त्यांच्यासोबत २० ते २५ इतकेच आमदार होते. त्यातील काही तर तातडीने पुन्हा शरद पवारांकडे आले होते. अजितदादांच्या त्या बळात फारशी वाढ झाली नसल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे.

follow us