Ajit Pawar on Sharad Pawar : सध्या राजकारणात सगळीकडेच राष्ट्रवादीच्या (NCP) फुटीची चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट नसून अजित पवार (Ajit Pawar) हे आमचेच नेते आहेत, असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालं. त्यांच्या या विधानावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी नो कॉमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, या विषयावर मला काहीच बोलायचं नाही. तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर विचारा ना, असं आवाहनच त्यांनी पत्रकारांना केलं.
अजित पवार हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते विकास कामांची माहिती देत होते. पत्रकारांनी त्यांना शरद पवारांच्या विधानाविषयी विचारले असता त्यांनी फक्त नो कॉमेंट्स असं म्हणत या विषयावर बोलणं टाळलं. ते म्हणाले, मी राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन, $3 ट्रिलियन करण्याविषयी बोलत आहे. त्याबद्दल बोला ना. राज्याच्या विकासाबाबत बोला. सर्वसामान्य लोकांना विकास पाहिजे. तुम्ही त्या विषयावर मला प्रश्न विचारा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
Sharad Pawar Live : कोल्हापुरात शरद पवारांचे जंगी स्वागत; निशाण्यावर कोण?
अजित पवारांनी पत्रकारांना आवाहन करूनही शरद पवारांच्या वक्तव्यावरच पत्रकारांनी त्यांना दादांना प्रश्न केला. त्यावर अजित पवार म्हणाले, नो कॉमेंट्स बोलल्यानंतर प्रश्न येतो कुठं? विकासाचं बोला. शहरातील प्रश्न आहेत, त्यावर बोला. राज्यातील सध्याच्या भौगोलिक – नैसर्गिक स्थितीबद्दल विचारा, राज्यात पाऊस नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याबद्दल विचारा. शरद पवार यांच्या वक्तव्यावर मी काहीही बोलू इच्छित नाही. मला कुठलंही वक्तव्य करायचं नाही. आता अशा राजकीय विषयांवर बोलून मला वेळ वाया घालवायचा नाही.
दरम्यान, शरद पवार यांनी आता आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे नेते आहेत, असे मी म्हटले नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. मी तसं बोललो नाही, तर सुप्रिया सुळे तशा म्हणाल्या असल्याचं शरद पवार यांनी दुपारी सांगितलं. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवरून संभ्रम वाढला आहे.
शरद पवार सकाळी काय म्हणाले?
सुप्रिया सुळे, अजित पवार हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला तर, आज तशी स्थिती येथे नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी आज सकाळी बारामती येथं केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं शरद पवारांचा अजित पवारांना छूपा पाठिंबा आहे का? याबाबत राज्यात पुन्हा संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर मात्र शरद पवारांनी दुपारी आपल्याच या वक्तव्यावरून घूमजाव केलं.