Amol Kolhe : मोदी सरकारने १८ सप्टेंबरपासून संसदेचे पाच दिवशीय विशेष अधिवेशन (special session of Parliament) बोलावले. मात्र, सरकारने या अधिवेशनाचा अजेंडा अद्याप जाहीर केला नाही. त्यामुळं विरोधक सरकारवर टीका करत आहे. संसदेत डान्स होणार आहे की, लावणी? अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. दरम्यान आता राष्ट्रवादीते खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) या अधिवेशनाविषयी मोठा दावा केला.
विशेष अधिवेशनाचा अजेंडा अद्याप जाहीर न केल्यानं मोदी सरकार लोकशाहीचे पतन करत असल्याची टीका कॉंग्रेसने केली. पीएम मोदींना पत्र लिहीत कॉंग्रेसने मणिपूर, महागाई, शेतकरी या मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी मागणी केली. हे विशेष अधिवेशन एक देश, एक निवडणूक विधेयक आणण्यासाठी बोलावले आहे, अशी चर्चा सुरू आहे.
केंद्रातील मोदी सरकारने 18 सप्टेंबरपासून पाच दिवस संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्याचा अजेंडा अद्याप जाहीर झालेला नाही. अशा स्थितीत हे अधिवेशन 17व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन ठरू शकते. त्यानंतर लोकसभा विसर्जित करून मोदी सरकार डिसेंबरमध्ये मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जाऊ शकते, असा दावा कोल्हे यांनी केला.
मोदी सरकारसाठी एक देश, एक निवडणूक अपरिहार्य असल्याने हा निर्णय घेतल्याचे खासदार कोल्हे म्हणाले. त्यामुळेच हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. कारण लोकसभा विसर्जित होण्यापूर्वी घेतल्या जात असलेल्या खासदारांच्या ग्रुप फोटोची तयारी दिल्लीत सुरू झाल्याचं दिल्लीतील सूत्रांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
96 कुळ्यांना कुणबी व्हायचे नसेल तर बिनधास्त मोकळे राहा…पण विरोध करू नका ; जरांगेंचा रोखठोक सवाल
लोकसभा निवडणूक वेळेपूर्वी का होऊ शकते, यावरही कोल्हेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, मोदी या हुकमी ब्रँडचा करिष्मा आता ओसरत चालला आहे, तो संपण्यापूर्वी त्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. तसेच, पुढील एप्रिल आणि मे महिन्यात दुष्काळ अधिक तीव्र होईल आणि ती बाब विरोधात जाणार असल्यां डिसेंबरमध्येच त्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत.
कोल्हे म्हणाले की, घरगुती गॅसच्या किमती कमी करण्याचे ट्रम्प कार्ड फोल ठरले. तसेच आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चार जागांवर पराभवाचा कल असल्याने मुदतपूर्व निवडणुक एक देश, एक निवडणूक या पद्धतीने मोदी सरकार घेईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.