Download App

प्रफुल्ल पटेल यांनी रडकुंडीला येऊन शरद पवारांना काय सांगितलं होतं?

अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. अजित पवारांबरोबर शरद पवारांचे निकटवर्तीय आणि विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील, छगन भुबजळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नेतेही गेले. प्रफुल्ल पटेल (Praful Patel हे अजित पवार गटात गेल्यानं त्यांनी शरद पवारांची साथ का सोडली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान, मी राष्ट्रवादीतील सगळ्या घडामोडींविषयी पुस्तकचं लिहिणार आहे, असं पटेल म्हणाले होते. दरम्यान, आता त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी आत्मचरित्रात सत्य लिहायचं असतं, असा टोला लगावला. (Ankush Kakade On Praful Patel Write true things in autobiography)

अकुंश काकडे म्हणाले की, आपण स्वतःचे आत्मचरित्र लिहिणार आहात असे जाहीर केलं, हे ऐकून अतिशय आनंद झाला. पण आत्मचरित्रात जे सत्य आहे, तेच लिहायचं असतं. आपल्या सोयीचे लिहू नका. शरद पवारांना बदनाम करु नका, अशा शब्दात पटेलांना ठणकावलं. काकडे म्हणाले, आपण विदर्भातील मोठे नेते आहात. 2004 पासून 2014 पर्यंत आपण केंद्रीय सत्तेत होतात. कोणत्या ना कोणत्या महत्वाच्या खात्याचे मंत्री होतात. शरद पवारांनी आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपणाला अधिकार दिले होते. त्या अधिकारांमध्ये आपण विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवाल अशी आमची अपेक्षा होती. आपण स्वतःच आत्मचिंतन केले तर विदर्भात किती राष्ट्रवादी वाढली याचे उत्तर देखील आपल्याला मिळेल, असा उपरोधिक टोलाही लगावला.

न्यायाच्या पाट्या उलट्या-पालट्या करताना शब्दार्थ बदलणार नाही, जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांना टोला 

तसेच पवारांनी कशा प्रकारे राजकीय पदे दिली याबाबतही काकडेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील शरद पवारांनी आपल्याला तीन वेळेला राज्यसभेत नियुक्त केलं. मंत्रिमंडळामध्ये देखील घेतले. तसं म्हणलं तर 2004 च्या निवडणुकीमध्येच आपण NDA मध्ये गेलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आपण घेतली होती. पण शरद पवारांना सांगण्याचं धारिष्ट तुमच्यात नव्हतं. म्हणून पुणे शहरातील शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या उद्योगपतीकडे आपण आलात. उद्योगपतींना सांगितलं की, शरद पवारांना आपण NDA मध्ये जाऊ असं सांगा, हे रडकुंडीला येऊन सांगितलं होतं किंवा नाही याचा खुलासा आपण केला तर बरं होईल, असं काकडे म्हणाले.

दरम्यान, अजितदादा हे कर्तृत्ववान आहेत. त्यांनी पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात वाढवला हे सत्य आहे. पण आपण महाराष्ट्र जाऊ द्या पण विदर्भात पक्ष किती वाढविला याचा हिशोब कार्यकर्त्यांना दिला तर बरे होईल, असंही काकडे म्हणाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज