Download App

फडणवीसांचा ‘अभिमन्यू’ यंदा अडकणार? निलंगेकर-देशमुखांकडून रचलं जातंय चक्रव्यूह

  • Written By: Last Updated:

मुख्यमंत्री, मंत्र्यांचे पीए, ओएसडी निवडणुकीच्या मैदानात उतरणे ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. पण एखाद्या पीएच्या उमेदवारीवर पक्षातूनच वाद होणे आणि त्या उमेदवारीला स्थानिक पाळीवरूनच विरोध होणे ही गोष्ट 2019 च्या निवडणुकीत बघायला मिळाली. औसामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री असताना त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पण त्यांच्या उमेदवारीवर पहिल्या दिवसापासूनच वाद सुरु झाले होते. भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचाही पवार यांच्या उमेदवारीला विरोध होता.

पण या विरोधानंतरही पवार निवडून आले आणि पाच वर्षे औसाचे प्रतिनिधित्वही केले. मात्र गेल्या पाच वर्षात निलंगेकर आणि पवार यांच्यातून विस्तवही जात नव्हता. बांधाला बांध असल्यासारखे दोघांमध्ये सतत खटके उडत राहिले. आता याच वाद आणि विरोधानंतर पवार दुसऱ्यांदा निवडणूक लढवायला सज्ज झाले आहे. तर काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी स्वतः या मतदारसंघात लक्ष घातले आहे. त्यामुळे फडणवीस यांचा अभिमन्यू चक्रव्युहात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. नेमके काय होऊ शकते या निवडणुकीत? औसामध्ये सध्याची राजकीय स्थिती काय आहे? (Ausa assembly constituency will be contested between Abhimanyu Pawar of BJP and Sham Bhosale of Congress)

हेच पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक विशेष सिरीजमधून…

औसा तालुका आणि निलंगा तालुक्यातील 68 गावे मिळून औसा मतदारसंघ बनला आहे. इतिहास पाहिला तर औसा मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. 1962 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे मल्लीनाथ गुंडानाथ महाराज येथून विजयी झाले होते. पण त्यानंतर 1995 पर्यंत इथे काँग्रेसचे उमेदवार निवडून येत राहिले. व्ही. एस. मुसंडे, केशवराव सोनवणे, शिवशंकर उटगे असे आमदार निवडून येत राहिले. 1985, 1990 आणि 1995 असे सलग तीनवेळा किशनराव संपतराव जाधव यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

Ground Zero : धीरज देशमुखांना रमेश कराड नडणार की पुन्हा पडणार?

यादरम्यानच्या काळात शेतकरी कामगार पक्ष इथे क्षीण होत गेला तर शिवसेनेची ताकद वाढत गेली. 1990 मध्ये शिवसेनेने पहिल्यांदाच या मतदारसंघात निवडणूक लढवत तब्बल 17 हजार मते घेतली. 1999 मध्थे तर शिवसेनेने मतदारसंघावर भगवा फडकवला. दिनकर बाबूराव माने हे येथून निवडून आले. पण माने यांच्या विजयात काँग्रेसचा हात असल्याचे बोलले जात होते. कारण माने हे विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक होते. स्वर्गीय विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील चाकूरकर हे दोन काँग्रेसचे गट लातूरमध्ये होते. त्यामुळे चाकूरकर यांना शह देण्यासाठी देशमुखांनी अप्रत्यक्षपणे माने यांनी मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळे माने यांनी चाकूरकर यांचे समर्थक मुजीबुद्दीन इस्माइल पटेल यांचा पराभव करत आमदारकी मिळविली. माने यांच्या रुपात पहिल्यांदाच ही जागा शिवसेनेला जिंकता आली. त्यानंतर 2004 ला मानेही सहज निवडून आले.

2009 ला मात्र शिवराज चाकूरकर गटाचे बसवराज माधवराव पाटील यांना काँग्रेसने तिकीट दिले. पण बसवराज पाटील हे मुळचे औसामधील नाहीत. ते उस्मानाबाद जिल्ह्याचील मुरुमचे रहिवासी आहेत. घरचा आणि बाहेरचा उमेदवार हा मुद्दा त्यावेळी गाजला होता. पण बसवराज पाटील यांनी आमदार दिनकर माने यांचा पंधरा हजार मतांनी पराभव केला. बसवराज पाटील यांना 84 हजार 526 मते मिळाली होती. तर दिनकर माने यांना 69 हजार 237 मते मिळाली होती. 2014 च्या निवडणुकीत बसवराज पाटील हे पुन्हा निवडून आले. त्यांनी माने यांचा नऊ हजार मतांनी पराभव केला. पाटील यांना 64 हजार 237 मते होती. तर माने यांना 55 हजार 379 मते मिळाली होती.

2014 मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र्य लढले होते. त्यात भाजपनेही येथून आपला उमेदवार दिला होता. भाजपचे पाशा पटेल यांना 37 हजार 414 मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले असले तरी भाजपला मिळालेल्या मतांची चर्चा झाली होती. 2019 मध्ये या मतदारसंघाचे राजकारण पूर्णपणे फिरले. महायुती असताना हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून भाजपकडे गेला. तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहणारे अभिमन्यू पवार यांना भाजपने उमेदवारी दिली. पण या उमेदवारीला भाजपमधून विरोध झाला.

तत्कालीन लातूर पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांचे बंधू अभय पाटील आणि इतर नेत्यांनी पवार यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. फडणवीस यांचा अभिमन्यू आता अडकणार की काय असा सवाल विचारला जाऊ लागला. पण देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवार यांची उमेदवारी कायम ठेवली आणि निवडूनही आणले. पवार यांनी दोन टर्मचे आमदार राहिलेल्या बसवराज पाटील यांचा तब्बल 27 हजार मतांनी पराभव केला. अभिमन्यू पवार यांना 95 हजार 340 मते मिळाली होती. तर बसवराज पाटील यांना 68 हजार 626 मते मिळाली होती.

यंदा लोकसभेला काय घडले?

हा मतदारसंघ लातूर जिल्ह्यात असला तरी लोकसभेला तो धाराशिव मतदारसंघाला जोडलेला आहे. लोकसभेच्या तोंडावर माजी आमदार बसवराज पाटील हेही भाजपमध्ये आले आहेत. विद्यमान आमदार पवार आणि माजी आमदार बसवराज पाटील हे दोघे असताना पण लोकसभेला महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना फायदा झाला नाही. या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओम राजेनिंबाळकर यांना तब्बल एक लाख दोन हजार 248 मते मिळाली होती. तर अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांना 67 हजार 282 मते मिळाली होती. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दिनकर माने यांनी निंबाळकरांसाठी झटून काम करत मोठे मताधिक्य मिळवून दिले. निंबाळकरांना मिळालेल मताधिक्य अभिमन्यू पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे.

अमित देशमुखांना ;देवघरातूनच’ आव्हान? अर्चना पाटील चाकूरकर टफ ठरणार?

महायुतीमध्ये ज्याचा आमदार त्याला जागा सूत्रानुसार भाजपला ही जागा सुटणार असून, येथून पुन्हा अभिमन्यू पवार हेच उमेदवार असतील. पण विरोध झाल्यास बसवराज पाटील यांनाही मैदानात उतरवले जाऊ शकते. महाविकास आघाडीमध्ये मात्र या मतदारसंघामधून मतदारसंघातून रस्सीखेच असणार आहे. लातूर ग्रामीण, लातूर शहर या मतदारसंघात देशमुख बंधू आमदार आहेत. या मतदारसंघांना लागून असलेला औसा मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे. एका कार्यक्रमात बोलताना अमित देशमुख यांना या मतदारसंघावर दावा ठोकला. त्यांनी केवळ दावा ठोकला नाही तर येथून काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी थेट आपले काका दिलीपराव देशमुख यांच्यावर दिली आहे.  “दिल्लीहून तिकीट मी आणतो. काका तुम्ही औसा ते मुंबईचे तिकीट आणा”, अशी साद अमित देशमुख यांनी आपल्या काकांना घातली आहे.

या मतदारसंघात काँग्रेसकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे हे इच्छुक आहे. तर मारुती महाराज सहकारी कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले हे दिलीपराव देशमुख यांच्या जवळचे आहेत. या मतदारसंघात लिंगायत मतदारांचा मोठा प्रभाव आहे. सुमारे 22 टक्के लिंगायत समाज आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी लिंगायत समाजातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक बैठक बोलविली होती. विधानसभेला काँग्रेसने प्रतिनिधित्व दिले नाही तर मतदान करणार नाही, असा इशारा बैठकीतून देण्यात आला आहे. शिवाय शेषराव पाटील यांना काँग्रेसे उमेदवारी दिली पाहिजे, अशी एकमुखी मागणी यावेळी केली आहे. तर ठाकरे गटाकडून दिनकर माने हे प्रबळ दावेदार आहेत.

त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाज जातीचा मोठा फॅक्टर असणार आहे. तसेच मुस्लिम मतदारसंघाची संख्याही मोठी आहे. एकूणच या मतदारसंघात जात आणि धर्म हा फॅक्टरही महत्त्वाचा असणार आहे. जागा वाटप आणि उमेदवार जाहीर करताना महाविकास आघाडीमध्ये कसरत होणार आहे. गेल्या वेळी अभिमन्यू पवार यांना काँग्रेसच्या एका गटाचा छुपा पाठिंबा होता. यावेळीही तसे होऊ नये म्हणून महाविकास आघाडीला प्रयत्न करावे लागणार आहेत. थोडक्यात महाविकास आघाडीची एकत्रितपणे एकजूट बघायला मिळाल्यास यंदा अभिमन्यू पवार चक्रव्युहात अडकतील हे नक्की आता त्यांना देवेंद्र फडणवीस कसे सोडवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us