मुंबई : दावोसवरुन काय येईल, हे आम्हाला माहीत नाही. पण तुमच्या नाकासमोरुन जे प्रकल्प पळवून नेलेत, ते आधी परत आणा, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर केलाय. आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणं माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्याला गेले नाहीत. मिहान आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून एअरबस, वेदांता फॉक्सकॉन अशा दोन लाख कोटींच्या वरची गुंतवणूक गुजरात आणि इतर राज्यात गेलीय. ती आधी घेऊन आलात तर दावोसला जाण्यात अर्थ आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
राऊत म्हणाले की, दावोसमध्ये जगभरातून राज्यकर्ते येतात. करार करुन फक्त आकडे सांगितले जातात. अमूक लाख कोटी, तमूक लाख कोटींचे करार झाले. प्रत्यक्षात दावोसमध्ये जेवढे करार झाले, त्यापैकी नक्की किती कंपन्या देशात आल्या, हे कुणीही सिद्ध करु शकलेलं नाही.
आमच्या डोळ्यासमोरुन एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, ड्रग्स पार्क असे अनेक प्रकल्प राज्यात आले, येतही होते. ते कुणीतरी खेचून घेऊन गेले. त्यामुळं दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा, असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिलाय.