Jayant Patil : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (Bharat Rashtra Samiti) महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. नांदेडमध्ये दोन सभा घेतल्यानंतर चंद्रशेखर राव यांनी औरंगाबाद आणि नागपूरमध्येही सभा घेतल्या. दरम्यान, विरोधकांनी चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला भाजपची बी-टीम म्हटले आहे. तर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपने राज्यात नवीन (बीआरएस) दुकान आणल्याचा आरोप केला. (Brings new political party into state to divide farmers’ vote; Jayant Patil’s criticism of BJP)
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कापसाचे भाव 13 हजारांवरून 6500 पर्यंत खाली आले. योग्य भाव मिळत नसल्यामुळं कांदा, टोमॅटो शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. राज्यातील शेतकरी निवडणुकीची वाटच पाहत होते. राज्यातील शेतकरी आपल्याला कौल देणार नाहीत, हे भाजप सरकारला कळून चुकले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी सत्ताधारी भाजपने राज्यात नवीन (बीआरएस) दुकान आणल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
धक्कादायक ! MPSC मध्ये तिसरी आलेल्या दर्शनाचा मृतदेह आढळला, मित्रही बेपत्ता
पाटील म्हणाले की, फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांनी समाजसुधारणेचे काम केले. या कामामुळे मूठभर लोकांची अडचण झाली. या सर्व महापुरुषांच्या प्रतिमा मोडल्या पाहिजे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. कधी राज्यपालांनी महापुरूषांविषयी बेताल वक्तव्ये केली, तर कधी आमदार-मंत्र्यांनी महापुरूषांचा अवमान केला. याचा अर्थ असा आहे, की सरकार अप्रत्यक्षपणे तुमचा-आमच्या श्रध्देवर हातोडा मारण्याचे काम करत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
यावेळी सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित, विचारवंत रावसाहेब कसबे, लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, निमंत्रक जयदेव गायकवाड, प्रा. सुनील मगरे, प्रा. प्रतिभा अहिरे, अभिषेक देशमुख आदी उपस्थित होते.