लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस. महाराष्ट्रातून काँग्रेस नेस्तनाबूत झालं होतं. 48 पैकी मोजून एक जागा निवडून आली आणि ती होती चंद्रपूरची. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा 44 हजार 763 मतांनी पराभव केला होता. अगदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही त्यांच्या मतदारसंघातून, म्हणजे नांदेडमधून पराभूत झाले होते. पण धानोकर यांनी बाजी मारली.
महाराष्ट्रात काँग्रेसची ज्योत तेवत ठेवण्याचं काम करणाऱ्या याच बाळू धानोरकरांचं आज पहाटे निधन झालं. वयाच्या 47 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 26 मे रोजी त्यांना नागपूरमध्ये किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात हालविण्यात आलं होतं. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी-आमदार प्रतिभा धानोरकर आणि दोन मुले असा परिवार आहे. (Congress MP Balu Dhanorkar Passed Away)
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2004 नंतर काँग्रेसला विजय मिळाला नव्हता. अशात 2019 च्या निवडणुकीत चंद्रपूरमधून काँग्रेसने माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार यांना तिकीट दिलं. पण बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवाराला तिकीट का, यावरून वादाला सुरुवात झाली आणि त्यांनी माघार घेतली. त्यानंतर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना चंद्रपूरमधून उमेदवारी जाहीर झाली. मात्र त्याचवेळी तत्कालिन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची एका कार्यकर्त्याशी बोलतानाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली. चंद्रपूरहून राजूरकर नावाच्या एका काँग्रेस कार्यकर्त्याने अशोक चव्हाण यांना केला होता.
राजूरकर :”सर, चंद्रपूर येथून विनायक बांगडे यांना तिकीट जाहीर झालं आहे. चंद्रपूरमधून आपला उमेदवार खात्रीशीर आहे ना.”
चव्हाण : , “तुम्ही जे म्हणताय ते तिकडे मुकूल वासनिकांशी बोलून घ्या. माझं पूर्ण समर्थन आहे, पण काही लोकांना समजत नाही. मी तुमच्याबरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये.”
राजूरकर: “मुकूल वासनिक काहीच नाही ना सर तुमच्यापुढे. तुम्ही सगळा महाराष्ट्र सांभाळता.”
चव्हाण: “माझं इथं कुणी ऐकायला तयार नाही. मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे. तुम्ही जरा वासनिकांशी बोला, आमची बाजू मांडा.”
अशोक चव्हाण यांनी ही ऑडियो क्लिप खरी असल्याचं म्हटलं होतं. या क्लिपमधील संवादानुसार काँग्रेसच्या विदर्भातील उमेदवारांची जबाबदारी मुकूल वासनिक यांच्याकडे होती. विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. खरंतर चव्हाण-वडेट्टीवार हे दोन्ही नेते धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. मात्र वासनिक आणि चव्हाण यांच्यात मतभेद झाल्याचे पुढे आले होते. यानंतर काँग्रेसने बांगडेंची उमेदवारी बदलून अखेरच्या क्षणी शिवसेनेतून आलेल्या धानोरकर यांना देण्यात आली.
खरंतर धानोरकरांना तिकीट द्यायच्या वेळी त्यांचा मद्यविक्रीचा व्यवसाय आणि चंद्रपुरात असलेली दारूबंदी उमेदवारीच्या आड आली. पण धनोरकरांना तिकीट नाकारल्याने मोठा गदारोळ झाला. यानंतर धानोरकर-वडेट्टीवार-अशोक चव्हाण या तिघांनीही मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. अगदी राहुल गांधींपर्यंत फिल्डिंग लावली. बाळू धानोरकर कसे विनिंग कँडिटेट आहेत, हे काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना पटवून दिले. त्यानंतर 2019 ला बाळू धानोरकर हेच काँग्रेससाठी मॅन ऑफ द मॅच ठरले.