Clear instructions were given Ajit Pawar was shocked by land purchase but Parth Pawar rushed through it : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांवर माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जमीन व्यवहारावरुन आरोप केल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्या अमीडीया हेल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विरोधक या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल करत आहे. त्यानंतर आता यामध्ये या प्रकरणावर आता स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी अजित पवारांनी मात्र या प्रकरणाशी संबंध नसून मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असंही त्यांनी म्हटलं आहे.
आरआरएसचा आहेस तर इकडे कशाला? राज ठाकरेंनी खडसावलं? पिट्याभाई म्हणाला, ते आमचे कान ओढू…
काय म्हणाले अजित पवार?
मला सांगायचं आहे की, टीव्हीवर जे काही सुरू आहे. त्याची मला माहिती नाही. त्या गोष्टींशी माझा दुरान्वये देखील संबंध नाही. मला राज्यातील जनता ओळखते. मी संपूर्ण माहिती घेणार आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी माझ्या कानावर आलं होतं. पण तेव्हा मी असं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असं सांगितलं होतं. अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. त्यानंतर काय झालं? मला माहिती नाही. मात्र टीव्हीवर ज्या बातम्या सुरू आहेत त्याची माहिती घेईल. पण मी आजपर्यंत कोणत्याही जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईंना फायदा होईल असा कोणताही फोन कोणत्याही अधिकाऱ्याला केलेला नाही. त्यामुळे या निमित्ताने मी राज्यातील अधिकाऱ्यांना सांगतो की, जर माझ्या नावाचा वापर करून अशा प्रकारे गैरव्यवहार होणार असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल. मा कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी या प्रकरणाची जरूर चौकशी करावी.
अंबादास दानवेंचे आरोप काय?
मेवाभाऊंच्या राज्यात… 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये! उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं.
गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल! दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली!
22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या 40 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये 500 ! फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र! अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
