Download App

काँग्रेसचा चाणाक्य महाराष्ट्राच्या मैदानात… विधानसभेला महायुतीची धडधड वाढणार?

काँग्रेसने सुनील कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची जबाबदारी सोपविली आहे.

काँग्रेसने आधी कर्नाटक जिंकलं. मग तेलंगणा ताब्यात घेतलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही शंभरी गाठली. काँग्रेसच्या बदललेल्या ताकदीने सध्या इंडिया आघाडीचाही कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे. आता काँग्रेसने (Congress) आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर (Maharashtra Assembly Election) लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी कर्नाटक (Karnataka), तेलंगाना (Telangana) आणि लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेसची (Congress) पडद्यामागून सूत्रे फिरवणाऱ्या चाणाक्याकडेच महाराष्ट्राचीही जबाबदारी दिली आहे. पाहुया नेमका कोण आहे हा चाणाक्य आणि महाराष्ट्रात काँग्रेसला कशी मदत करु शकणार? (Congress has entrusted the responsibility of Maharashtra Assembly Election 2024 to Sunil Kanugolu..)

मागच्या दहा ते बारा वर्षांमध्ये राजकीय रणनीतीकार या संकल्पनेला एक वेगळेच महत्व आले आहे. 2014 मध्ये प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत राजकीय सल्ला देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतरच प्रशांत किशोर यांना देशभर ओळखले जाऊ लागले. लोकभावना ओळखणे, लोकांना काय हवं आहे? नेत्यांनी कोणत्या मुद्द्यांवर प्रभावीपणे भर द्यायला हवा याबाबतची सल्ले हे राजकीय रणनीती काय नेत्यांना देत असतात. याच प्रशांत किशोर यांच्या तालमीत तयार झालेले सुनील कानुगोलू यांच्याकडे आता काँग्रेसने महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे.

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, रंगणार समाधी सोहळा

सुनील कानुगोलू यांना सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड मागणी आहे. कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्यात कानुगोलू यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीममध्ये एकेकाळी काम केलेल्या कानुगोलू यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाच्या धोरण समितीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. निवडणूक रणनीतीमध्ये कानुगोलू हे माहीर मानले जातात. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये कानुगोलू यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सत्ता मिळण्यात सुनील कानुगोलू यांचे निवडणूक नियोजन यशस्वी ठरले होते. कर्नाटकतील तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री बोम्मई यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. ‘40 टक्के कमिशनचे सरकार’ आणि ‘पे सीएम’ या दोन घोषणा लोकप्रिय ठरल्या होत्या. ‘पेटीएमच्या धर्तीवर पे सीएम’ ही कानुगोलू यांची घोषणा आकर्षक ठरली होती. कर्नाटकातील प्रचाराची सारी रणनीती त्यांनी ठरविली होती. गेल्या डिसेंबरमध्ये तेलंगणाच्या प्रचाराची जबाबदारी कानुगोलू यांच्याकडेच होती. मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांच्या प्रचाराचे सारे नियोजन त्यांनीच केले होते.

‘माझी लाडकी बहिण निवडणुकीपुरती.. एक, दोन हप्तेच मिळणार’; शरद पवारांचं खोचक भाष्य

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही कानुगोलू यांच्याकडे जबाबदारी देण्याची मागणी होत होती. मात्र अशोक गहलोत आणि कमलनाथ यांनी याला विरोध दर्शवला होता. याचा फटका ही काँग्रेसला या दोन्ही राज्यांमध्ये बसला होता. आता कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेसने सोपविली आहे. राज्यातील नेत्यांशी कानुगोलू यांनी रणनीतीबाबत नवी दिल्लीत चर्चाही केली आहे. कानुगोलू यांच्या सल्ल्यानुसार आता राज्यात काँग्रेसची रणनीती निश्चित केली जाणार आहे. त्यांच्या या रणनीतीला यश मिळणार का आणि काँग्रेस सत्ता स्थापन करू शकणार का हे येत्या निवडणुकीतच कळून येणार आहे

follow us