अशोक शंकरराव चव्हाण. दोनवेळच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा, स्वतःही दोनवेळचे मुख्यमंत्री, सोनिया गांधी-मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी-प्रियांका गांधी दोन्ही पिढ्यांशी थेट संपर्क असणारा आणि घनिष्ट संबंध असणारा राज्यातील कट्टर काँग्रेसी चेहरा. ही सगळी ओळख एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला “अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार!” ही चर्चा मागच्या दोन ते तीन वर्षांपासून सतत डोके वर काढते. कधी भाजपकडून या चर्चांना दुजोरा मिळतो तर कधी चव्हाणांच्या काही कृतींमधून संशय निर्माण होतो.
आताही या चर्चांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा नुकताच पार पडलेला नांदेड दौरा, यात “अनेकजण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे” त्यांनी केलेले सुचक विधान आणि त्यानंतर भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांनी चव्हाण भाजपमध्ये येणारच हा थेट केलेला दावा अशा कारणांनी या चर्चांना उजाळा मिळाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वी देखील अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारमध्ये असतानाही चव्हाण मोठा गट घेऊन भाजपसोबत येणार अशा चर्चा होत होत्या.
पण त्यांच्यावर निशाणा लावत भाजपने एकनाथ शिंदे आणि अजितदादांना आपल्यासोबत घेतले. पण आता नांदेड या चव्हाणांच्या होमग्राऊंडवरील खासदारांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा “अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार!” या चर्चांना उधाण आले आहे. तसे पाहिले काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे, कुणाल पाटील या अन्य नेत्यांबद्दलही भाजपप्रवेशाच्या चर्चा सातत्याने होत असतात. मात्र इतर कोणत्याही नेत्यांच्या चर्चांना एवढा दुजोरा ना भाजपकडून दिला जातो ना एवढी दखल माध्यमांकडून घेतली जाते. पण अशोक चव्हाण यांचे नाव ऐकताच सर्वांचेच कान टवकरतात, भुवया उंचावतात. याला कारणेही तशीच आहेत.
काँग्रेसला मराठवाड्यात डॅमेज करणे :
भाजपला अशोक चव्हाण हवे असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे काँग्रेसला मराठवाड्यात डॅमेज करणे. मराठवाड्यात काँग्रेसकडे चव्हाण यांच्यारुपाने एक मोठा आणि महत्वाचा चेहरा आहे. यापूर्वी विलासराव देशमुख, राजीव सातव या लोकप्रिय चेहऱ्यांनंतर मराठवाड्यात चव्हाणांनीच काँग्रेसला जिवंत ठेवले. 2014 मध्ये मोदी लाटेतही चव्हाण लोकसभेवर निवडून गेले होते. पण आता तेच जर भाजपमध्ये आले तर काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का बसू शकतो.
अशोक चव्हाण यांचा मराठवाड्यातील किमान 15 ते 18 विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव आहे. शिवाय हिंगोली, नांदेड या दोन लोकसभा मतदारसंघातील गणित बदलण्याची क्षमता चव्हाण बाळगून आहेत. आताही चव्हाण यांच्यासोबत 12 ते 15 आमदारांचा गट आहे. अशात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या काही सर्व्हेंमध्ये महायुतीला फटका बसणार तर महाविकास आघाडीला फायदा होणार असे चित्र दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर चव्हाण भाजपमध्ये आले तर चव्हाणांना मानणारा मोठा मतदारवर्ग भाजपकडे वळू शकतो असे आडाखे बांधले जात आहेत.
भाजपला मराठवाड्यात सर्वव्यापी चेहरा मिळू शकेल :
जी अवस्था काँग्रेसची, तीच अवस्था भाजपची आहे. भाजपलाही गोपीनाथ मुंडेंनंतर संपूर्ण मराठवाड्यावर प्रभाव असलेला चेहरा तयार करता आलेला नाही. पंकजा मुंडे यांच्या प्रभावाला पक्षाकडूनच ब्रेक लावण्यात आला आहे. भागवत कराड यांना केंद्रात मंत्रिपद देऊन त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न भाजपने केला. पण त्यांनाही प्रभाव तयार करता आला नाही. रावसाहेब दानवे यांचा विचार केल्यास तेही आता उतारवयाकडे झुकत आहेत. त्यामुळे भाजपला मराठवाड्यात एक मोठा आणि सर्वव्यापी चेहरा आवश्यक आहे.
अशोक चव्हाण यांच्यारुपाने ही कसर भरुन निघू शकते. मुख्यमंत्री राहिल्याने त्यांना संपूर्ण मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील प्रश्नांची जवळून जाण आहे. उद्योगमंत्री राहिल्याने उद्योजकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. चव्हाण यांच्या परंपरागत सहकारी संस्था असल्याने सहाकारातील राजकारणही त्यांना योग्य पद्धतीने हाताळता येते. याशिवाय मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने सध्या मराठवाड्यातच उचल खाल्ली असल्याने चव्हाणांच्यारुपाने मराठा चेहरा मिळू शकतो. त्यांनी हा प्रश्न जवळून हाताळला आहे. थोडक्यात शहरी-ग्रामीण आणि उद्योजक-शेतकरी अशा सर्वांना जोडणारा सर्वव्यापी चेहरा भाजपच्या गळाला लागू शकतो.
अशोक चव्हाणांचे स्वतःचे राजकारण :
अशोक चव्हाण यांचे वय सध्या पासष्टीच्या घरात आहे. या वयापर्यंत त्यांनी आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री अशी सर्व पदे भुषविली आहेत. त्यामुळे त्यांच्या राज्यातील राजकीय महत्वकांक्षा तशा फारशा नाहीत. पण आता स्वतःचे राजकारण केंद्रात विस्तारावे आणि वारसदारांचेही राजकारण सोपे व्हावे यासाठी त्यांना भाजपकडून लालूच दाखविली जात असल्याचे दिसून येते. शिवाय कार्यकर्ते आणि राजकारण या दोन्ही गोष्टी साधायच्या तर हाताशी सत्ता पाहिजे हे आताच्या काळातील अपरिहार्य गोष्ट आहे.
मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर मागील 15 वर्षांच्या काळात ठाकरे सरकारमधील अडीच वर्षे वगळता चव्हाण सत्तेतून बाहेरच राहिले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये तर त्यांची आदर्श घोटाळ्याची चौकशीच सुरु होती. त्यानंतर पाच राज्यात फडणवीस सरकार असताना ते लोकसभेत होते. या काळात ते प्रदेशाध्यक्ष होते, पण दिल्लीतून त्यांना फारशी ताकद दिली जात नव्हती. पक्षातील छोट्या-मोठ्या कुरबुरी मिटविण्यात आणि भाजपपासून पक्ष वाचविण्यातच त्यांची ताकद खर्ची जात होती. अशात आता आगामी काळात केंद्रात मोदी सरकार पुन्हा येणार असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत.
त्यामुळे दिल्लीत लाँग टर्मच्या पॉलिटिक्समध्ये जायचे असल्यास चव्हाण यांना भाजपशिवाय पर्याय नसणार हे ते स्वतःही ओळखून आहेत. यातूनच चव्हाण भाजपशी आणि शिवसेनेशी जवळीक साधत असल्याचे दिसून येते. शिंदे सरकार सत्तेत येताच त्यांच्या विश्वासदर्शक ठरवावेळी चव्हाण अनुपस्थित राहिल्याने या चर्चांवर जणू शिक्कामोर्तब झाला होता. फडणवीस यांच्याशीही त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय संबंध मधुर आहेत.
नुकतेच शिंदे सरकारने साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी सरकार गँरेंटर राहणार असा नियमात बदल केला. यानंतर पहिलेच 147 कोटी रुपयांचे कर्ज अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला मंजूर झाले. याशिवाय मागील दीड वर्षांच्या काळात राज्यातील विरोधी पक्षातील बहुतांश आमदारांच्या विकास कामांच्या निधीला कात्री लावण्यात आली. पण अशोक चव्हाण यांच्या कोणत्याही कामाला ब्रेक मिळाला नाही. याउलट त्यांना प्रत्येकवेळी अतिरिक्त निधी मिळत गेला.
याच सगळ्या संकेतांमुळे ते भाजप आणि शिंदेंच्या जवळ जात आहेत अशा चर्चा सातत्याने होत असतात. पण आता चव्हाण नेमके काय करणार? काँग्रेसमध्येच राहणार की भाजपमध्ये जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण त्यांनी काँग्रेस सोडल्यास पक्षाला मोठा फटका बसणार हे निश्चित. तर भाजपला फायदा होणार हेही नक्की.