Download App

गुंतवणुकीच्या नावाखाली योगींना ‘ईडी’ सरकारच्या पायघड्या; नाना पटोलेंचा आरोप

  • Written By: Last Updated:

मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी ते उद्योजकांना भेटत आहेत. त्यांनी मुंबईत रोड शो केला आहे. त्यावरून महाविकास आघाडीकडून योगी आदित्यनाथ आणि राज्य सरकारवर टीका केली जात आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्त्व कमी करणे हे भाजपाचे षडयंत्र आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ईडी सरकार पायघड्या घालत आहे, असा आरोप पेटोले यांनी केलाय.

उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेवरून पेटोले यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खराब आहे. योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्वतःच न्यायालय व न्यायाधीश असल्याच्या अविर्भावात बुलडोझर चालवून गोर गरिब व सामान्य माणसांची घरे जमीनदोस्त करते. महिला, अल्पसंख्याक, दलित समाज योगींच्या राज्यात सुरक्षित नाही, ते भयभीत होऊन जीवन जगत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

योगी आदित्यनाथ हे धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करतात. ज्या राज्यात धर्माच्या नावावर राजकारण केले जाते व सरकार चालवले जाते त्या राज्यात कोणता उद्योगपती गुंतवणूक करण्यास धजावेल ? पण महाराष्ट्रातील ईडी सरकारच्या मदतीने उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पटोले म्हणाले.

पटोले म्हणाले, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भाजपाशासित राज्यातील गुंतवणूक वाढावी, महाराष्ट्राचे महत्व कमी व्हावे, यासाठीच महाविकास आघाडीचे सरकार पाडून ईडीचे सरकार आणले आहे, असे वाटते. मुंबईतील फिल्म उद्योगावर योगी आदित्यनाथ यांचा डोळा आहे. हा उद्योग उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जाण्यासाठी याआधीही भाजपाकडून अनेक खटपटी करण्यात आल्या. मविआचे सरकार असताना अनेक निर्माते, अभिनेते व अभिनेत्रींना बदनाम करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला.

गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची काय गरज?
उद्योगपती काय रस्त्यावर उभे राहून भेटणार आहेत का? गुंतवणुकीच्या नावाखाली केवळ मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करणे हाच भाजपाचा अजेंडा आहे, यासाठी महाराष्ट्रातील खोके सरकार कामाला लागले आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे पटोले म्हणाले.

Tags

follow us