Deepak Kesarkar : माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना सरकारचा आवाज होते. कोणताही मुद्दा असो संघर्षाची स्थिती असो केसरकरांची मध्यस्थी असायची. पण, नव्या मंत्रिमंडळात केसरकरांना डावलण्यात आले. त्यानंतर केसरकर (Deepak Kesarkar) राजकारणातूनच गायब झाले आहेत. आता तर त्यांनीच राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. राजकारण निवडणुकीपुरते असते. मी पदाला चिकटून राहणारा व्यक्ती नाही. यापुढे निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही असे दीपक केसरकर म्हणाले आहेत. सावंतवाडी मतदारसंघात आमदार केसरकर यांच्या हस्ते 13 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी केसरकर बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच कुडाळ येथे सभा झाली. या सभेत दीपक केसरकर गैरहजर होते. त्यांची गैरहजेरी चर्चेची ठरली. केसरकर अजूनही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु, बायपास शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना सभेला हजर राहता आले नाही हे नंतर स्पष्ट झाले. याबाबत केसरकरांनी स्वतःच माहिती दिली. तसेच राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचेही संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले.
ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, दीपक केसरकरांनी केला मोठा गौप्यस्फोट
केसरकर पुढे म्हणाले, राजकारण हे निवडणुकीपुरते असते. मी पदाला चिटकून राहणारा माणूस नाही. त्यामुळे यापुढील निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही. फक्त जनतेची सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे. जनतेच्याच आशीर्वादाने काही दिवसांपूर्वी मला पुनर्जन्म मिळाला. त्यामुळे माझे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करत आहे. राजकारण लोकांसाठी असतं स्वतःसाठी नसतं.
चार रुग्णवाहिका आणून चार हजार माणसे गोळा करणारे लोकही आम्ही पाहिले आहेत. शिवसेनेने याआधी नऊ रुग्णवाहिका दिल्या होत्या. शिवसेना हा सामाजिक कार्यात आघाडीवर राहणारा पक्ष आहे. येथील रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठीच 13 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत असे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
कोकणी माणसावर ‘उबाठा’चे बेगडी प्रेम, दीपक केसरकरांचा हल्लाबोल