Download App

‘त्या’ ट्विटर हॅंन्डलवर कोणती कारवाई झाली याची माहिती घेऊ – देवेंद्र फडणवीस

  • Written By: Last Updated:

नागपूर : सीमावर्ती लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार पुर्णपणे उभा आहे. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका असणार आहे. यासंदर्भात आज लोकतांत्रिक पद्धीतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली. या संदर्भातली चर्चा कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांशी करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेदत दिली.

कोणत्याही परिस्थितीत सीमाभागाबाबत राज्याची भूमिका तसूभरही मागे जाणार नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत तालुक्यातल्या 42 गावांसाठी 2 हजार कोटी रुपये दिले आहेत. सीमाप्रश्न असो किंवा राज्यातला सीमाभाग असो यासंदर्भात राज्य सरकार गंभीर आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर सांगितले की काही विक्षिप्त ट्विट मोठ्या प्रमाणात असंतोष तयार करणारे होते. ते ट्विट माझे नाहीत, ते चुकीचे हॅंन्डल आहे. त्यांच्यावर कारवाई करु असे त्यांनी सांगितले आहे. कर्नाटक सरकारने कोणती कारवाई केली याबाबत आम्ही जरुर माहिती घेऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज महाविकास आघाडीतील नेत्यांनी विविध प्रश्नांवरून सरकारला घेरत विधानभवनाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. ‘कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे, महाराष्ट्रद्रोह्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणा देऊन विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. या घोषणाबाजीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे यांच्यासह महाविकास आघा़डीचे सर्व आमदार सहभागी झाले होते.

Tags

follow us