नागपूर : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी श्रध्दा वालकर प्रकरणाची विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करणारी लक्षवेधी विधानसभेत मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशिष शेलार यांची मागणी मान्य करीत विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्याची घोषणा केली.
‘कोणत्याही जाती-धर्माची मुलगी असली तरी सरकारने काळजी केली पाहिजे. श्रध्दा वालकर प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप आतापर्यंत झाला नाही. पण या प्रकारणात ठराविक घटनाक्रम आहे. 23 नोंव्हेबर 2020 रोजी अफताब पुनावाला याने श्रध्दाला मारहाण केली होती. त्यानंतर श्रध्दाने पोलीसात तक्रार केली होती. घरगुती कारणाने तिने अर्ज मागे घेतला असेल पण मधल्या काळात एक महिना गेला. तारखेत खाडाखोड दिसून आलीय. या प्रकरणात राजकीय दबाव दिसून येतोय, असा आरोप आमदार अशिष शेलार यांनी केला.
‘तत्कालीन मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रकारांनी विचारले होते पण त्यांनी उत्तर दिले नाही. त्यांच्या अशा भूमिकेने मनात शंका निर्माण होते. म्हणून श्रध्दा वालकर प्रकरणाची विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी अशिष शेलार यांनी केली. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अशिष शेलार यांनी मागणी केलेल्या प्रकरणाच्या चौकशीत नक्कीच गॅप दिसून येतोय. त्यांनी म्हटल्याप्रमाणे या प्रकरणात संशयीत घडामोडी दिसून येतात, श्रध्दाला मारहाण झाली होती. त्यानंतर तिने तक्रार केली होती. तिनेच तक्रार देखील परत घेतली. या मधल्या काळात काहीच कारवाई का झाली नाही? या सर्व प्रकरणाची विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्यात येईल’, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.