नवी मुंबई महापालिकेच्या वतीने काही नवीन (Health) आरोग्य सेवा सुरू करण्यात आल्या. हा कार्यक्रम आरोग्य सेवांपेक्षा राजकीय वादामुळंच गाजत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेच नाव कार्यक्रमपत्रिकेतून वगळण्यात आलं. गणेश नाईकांनी हे केल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेने केला आहे. तर आता भाजपाच्याच आमदार मंदा म्हात्रेंनी गणेश नाईकांवर आरोप करत कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला.
मंत्री गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मी स्थानिक आमदार असताना मला डावललं जातं आहे. गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी मला धक्काबुक्की केली. यांची मस्ती मी उतरवणार आहे, अशा शब्दात भाजपाच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाचेच मंत्री गणेश नाईक यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की, नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ज्या मातांना दूध येत नाही, त्यांच्या मुलांसाठी नवी मुंबईत एक साखळी करून मिल्क बँक सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर डायलिसिस मशीन दिले आहे, ते कंत्राटदाराने दिले आहे. कोणत्याही मंत्र्याने दिलेले नाही. महापालिकेने पहिली निमंत्रण पत्रिका व्यवस्थित छापली होती. दुसऱ्या पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचे नाव गायब करण्यात आलं आणि तिथे आमदार गणेश नाईक यांनी काम केलं असे लिहिण्यात आलं, असा गंभीर आरोप मंदा म्हात्रेंनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळं, मंत्री गणेश नाईक जातीवर काय बोलले?
नागरी कामांसाठी आमदार निधी दिलेला नाही. जी कामे ऐरोली मतदारसंघात करायला पाहिजेत, ती कामे बेलापूरमध्ये येऊन करत आहेत. ऐरोलीतील इतके प्रश्न आणि लोक माझ्याकडे येतात, कोणी तिथे निर्मळा केंद्र मागत आहे, कोणी व्यायामशाळा मागत आहेत. तिथल्या लोकांना रेशन कार्डच्या कामासाठीही यांची माणसं भेटत नाहीत. घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली य सर्व भागातील लोक माझ्याकडे येताहेत. माझ्याकडे कामांच्या कागदांचे गठ्ठे पडले आहेत”, अशी टीका आमदार म्हात्रे यांनी गणेश नाईकांवर केली.
आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की, २००४ मध्ये मी एक जेट्टी बांधली होती. तेव्हा यांनी मला तिथे येऊन सांगितलं की, मी इथला आमदार आहे. तुम्ही मला न विचारता कशी काय कामे करत आहात? आता गणेश नाईक स्वतःचे वाक्य विसरले का? मी पण आता इथली आमदार आहे. मला कुठे विश्वासात घेतले जाते? एल अँड टी कंपनीच्या सीएसआर फंडातून मी वर्षभरापूर्वी तो डायलिसिस मशीन्स इथे आणल्या होत्या. जे डायलिसिस आता सुरू केले आहे, ते याच पैशातून आहे. मग महापालिकेचा एवढा पैसा कुठे जात आहे?, असा सवाल मंदा म्हात्रे यांनी केला.
