नाशिक : स्वतःच्या पक्षाला धक्का देत अचानक सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरून नाशिक पदवीधर निवडणूक चर्चेत आली आहे. नाशिक पदवीधरसाठी काँग्रेसने विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण अनपेक्षित घडामोड घडून सुधीर तांबे यांच्या ऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
सत्यजीत तांबे यांच्या या धक्कातंत्रामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत देखील बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील संपत्तीचा खुलासा केला आहे. त्यामुळं आता अपक्ष उमेदवारीवरून चर्चेत आलेल्या सत्यजीत तांबे याच्या संपत्तीचे आकडे समोर आले आहेत.
सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्र सादर केलं आहे. सत्यजित तांबे व त्यांची पत्नी मैथिलीकडे १५.८५ कोटींची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. उमेदवारी शपथपत्रात सत्यजित यांनी आपले वार्षिक उत्पन्न ४९.१८ लाख रुपये आणि पत्नी मैथिलीचे ५२.२३ लाख रुपये असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडे २५ हजार रुपये आणि पत्नीकडे ४० हजार रुपये रोख आहेत. सत्यजित यांच्याकडे ६० तोळे (३० लाख) व पत्नीकडे ३०० तोळे (मूल्य रु. १.५० कोटी) सोने आहे.