नाशिक : दिवंगत लोकनेते नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं स्मारक हे 2014 मध्ये बांधल्या जाणार होतं. मात्र, आज इतके वर्ष झाली तरीही मुंडे यांचं स्मारक बांधल्या गेलं नाही. दरम्यान, आता गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक बांधण्यापेक्षा उपेक्षित-वंचित घटकांसाठी शिक्षणविषयक आणि वैद्यकीय सुविधा द्या, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांनी केली. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकापर्ण सोहळा आज पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, इतकी वर्ष झाले तरीही मुंडे यांचं स्मारक बांधल्या गेलं नाही. आता ते स्मारक बांधूही नका. लोकनेते मुंडे यांचं स्मारक बांधण्यापेक्षा उसतोड- कामगारांच्या मुलांसाठी वस्तीगृहे बांधा, संभाजीनगरला हॉस्पिटल बांधा. त्यामुळे उपेक्षित-वंचित समुहाला वैद्यकीय सोयी सुविधा मिळतील. मुंडे यांचा पुतळा उभारण्यासाठी गोरगरिबी लोकांनी पदरचे पैसे निधी म्हणून दिले. त्यामुळं आता आमचं कर्तव्य आहे, की गोरगरिब लोकांसाठी, उसतोड कामगारांसाठी काही केलं पाहिजे. मंत्री असतांना उसतोड मंडळ माझ्याकडे नव्हतं, त्यामुळं मला ऊसतोड मजुरांसाठी काम करता आलं नाही, ही खंतही त्यांनी बोलून दाखवली.
आज गोपीनाथ मुंडे आपल्यात नाहीत, ही गोष्ट प्रचंड वेदनादायी आहे. म्हणून प्रत्येक गावागावात गोपीनाथ गड उभे केले जातात. नगरमध्ये गोपीनाथ गड उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे आक्रमक होते, असं अनेकांना वाटतं. मात्र, त्यांचा आक्रमकपणा हा सामान्य लोकांच्या हितासाठी होता. आमच्यातलाही आक्रमकपणा हा सर्वसामान्य माणसांठीच असेल.
अहमदनगरमध्ये गोपीनाथ गड उभारणार; महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंची घोषणा
यावेळी बोलतांना पंकजा मुंडे यांनी नितीन गडकरी यांच्याविषयी कौतुकाचे उद्गार काढले. त्या म्हणाल्या, आज आज रस्ता म्हटलं तर की लोक म्हणतात, अरे याने संघटनेला रस्त्यावर आणलं. अनेक पुढाऱ्यांनी जनतेला रस्त्यावर आणलं, अशी भावना लोकाच्या मनात आहे. मात्र, गडकरी साहेबांनी विकास हा रस्त्यावरच्या माणसांपर्यतं पोहोचवला. त्याचं काम लोकांच्या कायम लक्षात राहिल. त्यांनी माझ्या कोणत्याही कामाला कधी नाही म्हटलं नाही. ओठात एक आणि पोटात दुसरं असं गडकरी यांचं नाही. एखादं काम होत असेल तर ते त्याला होकार देतात, आणि काम होत नसेल तर त्याला नाही म्हणतात.
या कार्यक्रमा दरम्यान, पाऊसाने हजरे लावली. यावेळी पंकजा मुंडेंनी संघर्षयात्रेतील पावसाची आठवण देत सांगितलं की, या कोसळणाऱ्या पावसाच्या थेंबात ज्वाला आहेत. आता पुन्हा पेटून उठायचं, कुणापुढं झुकायचं नाही, असं सांगत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री दादा भुसे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, भारती पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे, खा. प्रीतम मुंडे, आ. मोनिकाताई राजळे, आ. सुधीर तांबे, मनसे नेते प्रकाश महाजन आदी नेते उपस्थित होते.