Eknath Khadse On BJP-Shivsena : आगामी पार्श्वभूमीवर विरोधकांची इंडिया अलायन्स आणि सत्ताधारी एनडीएमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एनडीएचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बैठक घेतली. यावेळी शिवसेनेने युती तोडल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केला. मात्र, नरेंद्र मोदी जे बोलले ते संपूर्ण सत्य नसून अर्धसत्य असल्याचा दावा भाजपचे तत्कालीने नेते आणि सध्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. (Eknath Khadse critisize PM Narendra Modi over shivsena bjp allience)
मंगळवारी महाराष्ट्र सदनात एनडीएच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत मोदींनी भारतीय जनता पक्षाने नव्हे तर शिवसेनेने महाराष्ट्रात युती तोडल्याचे वक्तव्य केलं. यासंदर्भात एकनाथ खडसेंनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेने 2014 मध्ये युती तोडल्याचा दावा केला. आम्ही युती तोडलेली नाही. उद्धव ठाकरेंनीच तोडली, असं मोदी म्हणाले. मोदींनी खासदारांना जे सांगितले ते अर्धसत्य आहे. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे भाजप-सेनेचे सरकार येईल, असा आम्हाला विश्वास होता. त्यावेळेस अनेक लोक भाजपमध्ये यायला लागले होते. तिकीट मागायला लागले होते. अशा परिस्थितीत अनेकांना तिकीट देण्यात अडचण येत होती. त्यामुळे आमच्यात चर्चा सुरू झाली आणि भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता, असं खडसे म्हणाले.
लोकसभेत राहुल गांधींना घेरताना अमित शाहंनी उल्लेख केलेल्या ‘कलावती’ कोण?
ते म्हणाले, निवडणुकीच्या अडीच महिने आधी युती तोडण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यानंतर भाजपने युती तोडली. आम्ही पक्षात चर्चा करूनच निर्णय घेतला. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस आणि मीही होतो. युती तोडायचं हे कुणी आणि कसं सांगावं? यावर आम्ही चर्चा केली. मला लगेच मुंबईला बोलावण्यात आलं. त्यावेळी फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते. फडणवीस यांनीच युती तोडण्याची घोषणा करायला हवी होती. पण ती जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. यानंतर मी उद्धव ठाकरेंना फोन करून युती तोडत असल्याचे सांगितले.
जागा वाटपावरून युती होत नसल्याचं उद्धव ठाकरेंना सांगितलं आणि युती तोडली. त्यानंतर सुभाष देसाई आणि अरविंद सावंत आले. युती न तोडण्याचा त्यांनी आग्रह धरला. त्यावर हा निर्णय माझा नाही. तर तो पक्षाचा आहे, असं मी त्यांना सांगितलं. त्यावेळी हेच घडलं होतं. नरेंद्र मोदी काल जे बोलले ते सत्य नाही, असं खडसेंनी सांगितलं.
युती तुटण्यामागे जागावाटपाचा मुद्दा होताच. तेव्हा शिवसेना १७१ जागांवर लढत होती. आणि भाजप ११७ जागांवर लढत होती. पण, देशात भाजपचे वातावरण होते. त्यामुळे भाजपला जास्त जागा मिळाव्यात अशी भाजपची इच्छा होती आणि आपली सत्ता येईल असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे युती तोडली. मला काय वाटलं होतं, यापेक्षा पक्षाला काय वाटलं होतं हे महत्त्वाचे आहे. पण त्यावेळी मलाच बदनाम केलं गेलं, अशी खंतही खंतही त्यांनी व्यक्त केली.