Eknath Shinde clarified the government’s stance in Parbhani : परभणीमध्ये आज शिवसेनेचा शेतकरी मेळावा पार पडला. खासदार संजय जाधव यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, या मेळाव्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त करत खासदार संजय जाधव यांना इशाराही दिला होता. त्यानंतरही नियोजित कार्यक्रम पार पडल्याने या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर आपल्या भाषणातून शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मला कोणावरही टीका करायची नाही. ठरलेला कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणं शक्य नव्हतं. मराठा समाजाला न्याय देण्याची सुरुवात महायुती सरकारने केली आहे. कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबतही त्यांनी भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांची समाजाविषयीची तळमळ मला माहिती आहे. आताही आमचे मंत्री जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत, असे सांगत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून चर्चा सुरू असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘राहुल गांधींनी FIR दाखल केली का?’ खरगेंच्या कथित ‘शुद्धीकरणा’वरून प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल
दरम्यान, या कार्यक्रमावरून मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनीही दिलगिरी व्यक्त केली. मी मनोज जरांगे पाटील यांचे मनापासून स्वागत करतो. साहेब, 11 वाजता कार्यक्रम होता. ऐनवेळी कार्यक्रम रद्द केला असता तर लोकांनी मला मारलं असतं. काय संकट ओढवलं असतं माहिती नाही. जर तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे संजय जाधव यांनी म्हटले.
या मेळाव्यादरम्यान मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमस्थळी दाखल झाल्यानंतर काही आंदोलक आक्रमक झाले आणि ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देण्यात आल्या. शिंदे भाषणासाठी उभे राहिल्यानंतरही घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असताना दुसरीकडे परभणीतील शिवसेनेच्या मेळाव्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. जरांगे पाटील यांनी कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतरही मेळावा पार पडला. मात्र, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी सरकारकडून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले.
