Eknath Shinde : राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महायुतीकडून या निवडणुकांची (Maharashtra Local Body Elections) जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. महायुतीत इनकमिंग वाढली आहे. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या प्रकरणानंतर माध्यमांत कमी बोला, कामं जास्त करा असा सल्ला शिंदेंनी मंत्र्यांना दिला आहे. तसेच मंत्र्यांना दिलेल्या जिल्ह्यांतून निवडणुकीत अपेक्षित निकाल दिसला पाहिजे अशी तंबीही शिंदे यांनी दिली आहे. एकप्रकारे त्यांनी परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचे संकेतच दिले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
प्रसारमाध्यमे आणि लोकांत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मंत्र्यांचे नाव तर खराब होतेच शिवाय पक्षाचीही प्रतिमा मलीन होते. प्रत्येक वेळी विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलंच पाहिजे असे काही नाही. उत्तर द्यायचंच असेल तर आपल्या कामांतून द्या अशी तंबी एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मंत्र्यांना दिलेल्या जिल्ह्यांत अपेक्षित परिणाम दिसले पाहिजेत अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे.
Video : गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बंद दाराआड खलबत; शिंदेंनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं?
मागील काही दिवसांत महायुतीतील मंत्र्यांची वादग्रस्त विधाने करण्याची स्पर्धाच लागली आहे. माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, संजय गायकवाड यांच्या कारनाम्यांनी राजकारण ढवळून निघालं. मंत्र्यांच्या या वर्तणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर विधीमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांना कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली. मंत्र्यांच्या या वर्तणुकीचीही किनार शिंदे यांच्या मंत्र्यांना दिलेल्या तंबीत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौराही सध्या चर्चेत आहे. या दौऱ्यात शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची (Amit Shah) भेट घेतली. अमित शाह यांच्याशी खासदारांसह आणि नंतर एकांतात जवळपास अर्धा तास चर्चा केली. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तरीदेखील या बैठकीत काय राजकीय चर्चा झाली याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. भारतीय सैन्याच्या ऑपरेशन महादेवच्या यशामुळे एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना भगवान शंकराची प्रतिमा भेट म्हणून दिली.