Download App

Eknath Shinde यांच्या शिवसेना पक्षात अंतर्गत वाद, माजी आमदाराची संपर्कप्रमुख पदावरुन हकालपट्टी

अकोला : निवडणूक आयोगाने बहाल केल्याने शिवसेना पक्ष आणि चिन्ह यांचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे आले आहे. यामुळे शिवसेनेत (Shiv Sena) आता पक्षांतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे दिसत आहे. या वादाची पहिली ठिणगी अकोला जिल्ह्यात पडली. ज्यामुळे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांची पक्षाच्या संपर्कप्रमुख पदावरुन थेट हकालपट्टी करण्यात आली. या पदाची जबाबादारी आता खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली.

गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी आल्यावर शिवसेना (शिंदे गट) (Shinde group) पक्षात मोठा वाद निर्माण झाला. यामुळे त्यांना पदावरुन तातडीने हटवल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात वादाची राज्यभर चर्चा पाहायला मिळते. परंतू, शिंदे यांनी निवडणूक आयोगाकरवी मिळवलेल्या शिवसेनेतही भलतेच वाद सुरु झाले आहे. अकोला जिल्ह्यात तर पक्षांतर्गत वादाने अत्युच्च टोक गाठले आहे.

IND vs AUS 3rd Test: फिरकीच्या जाळ्यात फलंदाज अडकले, भारत पराभवाच्या उंबरठ्यावर

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुखाच्या घरात जाऊन तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक नेतृत्व विरुद्ध पक्षात विविध पदाधिकारी असा सामना रंगला आहे. तो आता परस्परांविरुद्ध पोलिस तक्रारी करण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. मुख्यमंत्र्यांनी विशेष विकासनिधीच्या नावाखाली दिलेल्या 15 कोटी रुपयांवरुन हा वाद पेटला आहे. हा निधी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याऐवजी बाजोरिया यांनी स्वत:च हा पैसा लाटला, असा आरोप करण्यात येत आहेत.

दरम्यान, हा निधी बाजोरिया यांनी स्वत:च्या विकासकामांकडे वळविल्याचे काही समोर असल्याची चर्चा होत आहे. यामुळे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी थेट शिंदे यांनाच पत्र लिहीले आहे. या पत्रात बाजोरिया यांचा उल्लेख थेट ‘कमिशन एजंट’ असा केला आहे. बाजोरिया हे पक्षवाढीसाठी काम न करता ते केवळ आणि केवळ स्वत:हित आणि जवळच्याच लोकांचा भरणा करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे शिंदे यांनी मोठा निर्णय घेत त्यांना पदावरुन हटवले.

Tags

follow us