Shambhuraj Desai : शिंदेंच्या शिवसेनेच्या जाहिरातबाजीवर नाराज होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कालचा कोल्हापूर दौरा रद्द केला होता. यानंतर कानाला त्रास होत असल्याने हवाई प्रवास टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे दौरा रद्द करण्यात आल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतरही विरोधक दाद द्यायला तयार नाहीत. खासदार संजय राऊत त्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खोचक शब्दांत टीका केली होती. ही टीका शिंदे गटाच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आमदार रोहित पवार यांना सल्ला दिला आहे.
‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण
मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी आज लेट्सअप मराठीच्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावेळी त्यांना रोहित पवार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर देसाई म्हणाले, रोहित पवार आमदार आहेत. संजय राऊत सुद्धा असेच काही बोलले होते. त्याचेच रिपिटेशन रोहित पवार यांनी केले. रोहित पवार आमचे मित्र आहेत नवीन आमदार आहे. बराच कालावधी त्यांना पूर्ण करायचा आहे. माझा त्यांना सल्ला आहे की राऊतांची वाक्ये जास्त कानावर पडू देऊ नका. राऊतांची संगत ज्यांना ज्यांना लागली त्यांची काय स्थिती झाली हे त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे रोहित पवारांनी अशा गोष्टीत फार लक्ष देऊ नये. तुमचं काम तुम्ही करा. आम्ही युतीचे काम चांगले करत आहोत.
काय म्हणाले होते रोहित पवार?
या जाहिरातीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्र्यांसमवेतचा कोल्हापूर दौरा टाळला. तसेच आज एसटी महामंडळाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. या घडामोडींवर टीका करताना रोहित पवार म्हणाले, इजा कानाला झाली नव्हती तर मनाला झाली होती. मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज दुसरी जाहिरात दिसली.
वाऱ्याने कान दुखू शकतो – राऊत
दरम्यान, याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही टीका केली होती. महाराष्ट्रात सध्या जे वारे वाहत आहे ते वारे कानात गेल्याने कदाचित कान दुखू शकतो, अशी टीका त्यांनी फडणवीस यांच्यावर केली होती.