मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. “कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विधान पुरेसे बोलके आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत विधीमंडळाच्या आवारात गप्पा मारताना शिंदे हे बोलून गेले आणि सरकारची सारी दिशाच स्पष्ट झाली. आता जरांगे यांच्या आंदोलनाची विशेष पथकाकडून चौकशी करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा होता, हे शोधून काढण्याचे काम या पथकाकडे देण्यात आला आहे.
यात भाजप आमदारांचा रोख हा माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार राजेश टोपे यांच्यावर आहे. जरांगे पाटलांना सातत्याने आंदोलन करायला लावणे, त्यांच्यासाठी आर्थिक मदत करणे आदी बाबींवर सत्ताधारी आमदारांनी आज टीका केली. पण राजेश टोपे यांचे नाव यात का घेण्यात येत आहे आणि त्यात तथ्य आहे का, याचा शोध या निमित्ताने घेऊ. (Former Health Minister and NCP (Sharad Chandra Pawar) MLA Rajesh Tope supported Manoj Jarange Patil’s movement)
मनोज जरांगे हे ज्या आंतरवली सराटी या गावात सुरुवातीला उपोषणाला बसले ते गाव जालना जिल्ह्यात आणि अंबड तालुक्यात येते. राजेश टोपेंच्या घनसांगवी विधानसभा मतदारसंघात हे गाव येते. राजेश टोपे यांचा अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना या गावापासून तीन किलोमीटवर अंतरावर आहे. राजेश टोपे हे आजही शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवून आहेत. ते भाजपशी युती केलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नाहीत. या साऱ्या बाबी टोपेंवर संशय व्यक्त करण्यासाठी सत्ताधाऱ्यांसाठी पुरेशा आहेत.
मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले या मागणीसाठी जरांगे 28 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्यांदा उपोषणाला बसले. उपोषण संपविण्यासाठी 31 ऑगस्टच्या रात्री तेथे पोलिसांचा लाठीमार झाला आणि एक सप्टेंबरपासून या आंदोलनाची तीव्रता वाढली. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जरांगे हे हिरो झाले. रात्री लाठीमार झाल्यानंतर जरांगे यांना किरण तात्या नावाच्या व्यक्तीच्या घरी ठेवण्यात आले. किरण तात्या हे टोपे यांचे कार्यकर्ते. ते गावचे माजी सरपंच आणि टोपेंच्या कारखान्यावर संचालकही आहेत. किरण तात्या यांनी त्या रात्री आपल्या घरात फक्त राजेश टोपे यांनाच प्रवेश दिला. त्या रात्री टोपे आणि जरांगे यांची बैठक झाली.
तिथूनच मग जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. त्यांना मिळणारा पाठिंबा वाढला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही लगेच तेथे पोहोचले. मग या आंदोलनाची दखल देशभरातल्या मिडियाने घ्यायला सुरवात केली. या साऱ्यामागे राजेश टोपे यांचाच हात हे सिद्ध होते, असा आरोप विरोधक करत आहेत. टोपे यांच्या या भागात जंगी सभा झाल्या. त्यासाठी टोपे आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी मदत केली. भाजपच्या विरोधात रान पेटविण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला, असाही टोपेंवर आरोप आहे.
पण राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार जरांगे पाटील यांचे आंदोलन माझ्याच मतदारसंघात सुरू होते. त्यात माझे अनेक कार्यकर्तेही सहभागी होते. तसेच इतर पक्षांचे देखील कार्यकर्ते यात होते. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्वच पक्षाचे मराठा कार्यकर्त्यांनी जरांगेंना मदत केली. जरांगे यांचे आंदोलनच इतके मोठे होत गेले की त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत गेला. पण माझा या आंदोलनाशी, दंगल घडविण्यामागे माझा काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अशात जरांगे पाटील यांना मदत करण्यात सत्ताधारी पक्षाचे नेतेही सक्रिय होत असल्याची माहिती आता इतर विरोधकांकडून देण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसआयटीचा तपास हा ‘चिवट’पणे करा, असा खोचक सल्ला दिला. चिवट हा शब्द वापरून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचेच नाव अप्रत्यक्षपणे घेतले आहे. चिवटे हेच अनेक मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना आणि माजी न्यायाधीशांना खास विमानाने अंतरवाली सराटीला घेऊन जात होते. जरांगे हे जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे ऐकत होते तोपर्यंत जरांगे हे त्यांच्यासाठी हिरो होते.
पण दहा फेब्रुवारी नंतर जरांगे हे तिसऱ्यांदा उपोषणाला बसल्याने शिंदे आणि जरांगे यांच्यातील संबंध बिघडले. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा सरकारने मंजूर केला. तेव्हा जरांगे शांत बसतील, अशी शिंदे यांना अपेक्षा होती. पण हट्टी जरांगे यांनी ‘सगेसोयरे’ या शब्दावर ठाम राहत दुसरी तडजोड स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे जरांगे यांना बेदखल करण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात आला. त्यात जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिविगाळ करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला.
या साऱ्या प्रकारात राजेश टोपे आणि दुसरे आमदार रोहित पवार यांना अडकविण्याचा सत्ताधाऱ्यांची योजना दिसून येत आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी या विषयावर बोलताना विधानसभेचे दोन आमदार जरांगेंना चिथावणी देत होते, असे स्पष्टपणे बोलले. त्यात त्यांनी नाव घेतले नसले तर टोपे आणि रोहित पवार हेच आमदार त्यांच्या डोळ्यासमोर असल्याचे स्पष्ट आहे. आता एकूणच जरांगे यांचे आंदोलन हे आता राजकीय गोल सेट करण्याचे साधन बनणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी जरांगे यांचा प्रभाव कमी करणे आणि त्या माध्यमातून राजकीय विरोधकांनाही गारद करणे अशी आता सत्ताधाऱ्यांचे धोरण दिसून येत आहे. याचा प्रत्यक्ष निवडणुकीत काय परिणाम दिसेल, हे दिसून येईलच. पण सध्या तरी जरांगे यांच्यावरील सरकारची वक्रदृष्टी आणखी कठोर होणार हे निश्चित.