Girish Mahajan : एकेकाळी एकमेकांचे सहकारी असलेले भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आताही महाजन यांनी अतिशय खोचक शब्दांत खडसेंवर टीका केली. महाजन आणि फडणवीसांनी भाजप पक्षात प्रवेशासाठी मला विरोध केला, असा गौप्यस्पोट खडसेंनी केला होता. त्यावर बोलतांना महाजनांनी एवढ्या मोठ्या नेत्याची लाचारी मी पहिल्यांदाच बघतो आहे, असा टोला त्यांनी खडसेंना लगावला.
‘मी तसं बोललो हे दाखवून द्या, राजकारणातून निवृत्ती घेईल’; उमेश पाटलांचं अजितदादांना चॅलेंज
एवढी लाचारी मी आजपर्यंत पाहिली नाही
गिरीश महाजन यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. खडसेंकडून होत असलेल्या आरोपांवर बोलतांना ते म्हणाले की, मी विनंती केली असे ते म्हणतात. प्रवेशही झाला. फोटोही काढले. पण, मला ते घेतच नाही. एवढी लाचारी मी आजपर्यंत पाहिली नाही. मला एकनाथ खडसेंची कीव यायला लागली आहे, असं महाजन म्हणाले.
महाजन पुढे म्हणाले, एकनाथ खडसे हे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन जातांना मी पाहिलं आहे. 90 च्या दशकात काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षात घेतले, तिकीट दिले आणि आमदार केले. 15 ते 20 वर्षे लाल दिव्याच्या गाडीतून फिरले. त्यांच्याप्रमाणे मी काँग्रेसमध्ये नव्हतो. नंतर ते भाजपमध्ये आले. पण मी भाजपमध्ये सुरूवातीपासून होतो, अशी टीकाही त्यांनी केली.
पुढे बोलताना महाजन म्हणाले, तुम्ही तुमच्या मतदारसंघात का पडले? तुमची कुठलीतरी ग्रामपंचायत आहे का? तुमच्या मतदारसंघात नगरपालिका तरी आहे का? काय आहे तुमच्या मतदारसंघात ? असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. एकदा 1400 मतांनी निवडून यायचे, तर कधी 1800 मतांनी निवडून यायचे, तुमचे आणि माझे मताधिक्याील फरक केवढा आहे बघा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
महाजन म्हणाले, पारोळ्याचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी त्यांना चांगलेच सुनावले की, पोरीची निवडणूक आली की, पोरीचे काम करायचे, सुनेचे काम आले की, सनेचे काम करायचे. यांची कमाल आहे, दुसरीकडे कोणी नको सगळ्या ठिकाणी आम्हीच पाहिजे, ही भूमिका त्यांची आहे आणि हे लोकांना कळायला लागले आहे. त्यांनी कितीही अश्लील आणि काहीही बडबड केली तरी माझ्या मतदारसंघामध्ये माझा जनतेचा विश्वास माझ्यावर आहे, असं महाजन म्हणाले.
पळता भुई थोडी होईल, महाजनांचा इशारा
केवळ पद भोगायची, बडबड करायची, एवढंच काम त्यांच्याकडे राहिलं आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते वाह्यात सारखे काही बोलत आहेत. बोलण्यासारखे तर माझ्याकडे सुद्धा खूप आहे. मी बोलायचं ठरवलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल. वेळ येईल त्यावेळी मी नक्की बोलेन, असा इशाराही त्यांनी दिला.