नागपूरः हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला आहे. दररोज आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आज विधिमंडळ परिसरात वेगळेच चित्र दिसून आले. मंत्री गुलाबराव पाटील व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकमेंकाशी गुप्तगू करताना दिसले. बराच वेळ ते एकमेंकाशी बोलत होते. त्यांच्या बाजूने जाणारे सत्ताधारी पक्षातील आमदार, विरोधी पक्षातील आमदार हे चित्र पाहत होते. त्यातील काही जण हे दृश्य बघून हसत होते.
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचा विधिमंडळाबाहेरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पाटील आणि पटोले हे एकमेंकाबरोबर चर्चा करताना दिसत आहे. तेथून विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री हसन मुश्रीफ, किरण लहामटे, धनंजय मुंडे हे तेथून जाताना दिसत आहे. त्याचवेळी गुलाबराव पाटील हे सर्वांना हात जोडून नमस्कार करतात. त्यावेळी अजित पवार हेही नमस्कार करतात. त्यावेळी अजितदादा हे गुलाबराव यांच्याकडून बघून गालातल्या गालात हसतात. त्यावेळी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही हे सर्व प्रकार पाहतात. हे सर्वजण निघून जातात.
त्यानंतरही दोघांमध्ये चांगलीच चर्चा सुरू होती. बराच वेळ दोघे चर्चा करत होते. दोघांच्या चर्चेवरून एकमेंकाशी ते एखाद्या महत्त्वाच्या बाबींवर बोलत असल्याचे दिसत होते. परंतु ते काय बोलत हे समजून शकलेले नाही. परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर वेगवेगळ्या कमेंटसही येत आहेत.