अहमदनगर : नाशिक पदवीधर निवडणुकीवरून सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे चांगलेच गाजले. यातच पक्षविरोधी कारवाई केल्याने काँग्रेसने तांबे यांना पक्षातून निलंबित केले. मात्र सत्यजित तांबे यांच्या घरातील वाद अजित पवारांनी (Ajit Pawar) लावला, यावर पवार म्हणाले, माझ्या कोणत्याही वक्तव्यामुळे आमच्या महाविकास आघाडीमध्ये अडचणी निर्माण होतील असं मी कोणतही वक्तव्य करणार नाही, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले आहे.
विरोधी पक्ष नेते अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्यजित तांबे यांच्या कुटुंबातील वाद हा अजित पवार यांनी लावला असा आरोप ना पटोले यांनी केला आहे, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला.
यावर बोलताना पवार म्हणाले, माझ्या कोणत्याही वक्तव्यामुळे आमच्या महाविकास आघाडीमध्ये अडचणी निर्माण होतील असं मी कोणतही वक्तव्य करणार नाही. तुम्ही नाना पटोले यांचं नाव सांगून कितीही प्रश्न विचारले तरी आम्ही वरिष्ठ बंद खोलीत चर्चा करू तुम्ही ते डोक्यातून काढा असा सल्लाच अजित पवारांनी पत्रकारांना दिला आहे.
दरम्यान निवडणुकांबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार सरकारला आहे. आम्हाला असं वाटतं की आत्ताच्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये त्यांना झटका बसला आहे. त्यांनी कितीही आव आणला तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना फटका बसेल अशी भावना त्यांची झाली असल्यामुळे ते निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत आहे. मात्र निवडणूक म्हंटले की कोणाला यश मिळते तर कोणाला अपयश ही मिळते. अपयशाने खचून जायचं नसत तर यशाने हुरळून जायचं नसत असं अजित पवार म्हणाले.
शिवरायांवरील आव्हाडांचं मत वैयक्तिक असू शकते…
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले ती पक्षाची भूमिका नाही, पक्षाचे प्रवक्ते किंवा नेते यांनी जर भूमिका मांडली असती तर ती पक्षाची भूमिका होती. ते त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं पवार म्हणाले