Download App

‘तुम्हाला सीएम व्हायचं होतं तर पोराला मंत्री करायला नको होतं’; ठाकरेंना खासदाराने दिला घरचा आहेर

  • Written By: Last Updated:

हिंगोली : काही महिन्यापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. तसेच बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला. हा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का होता. सत्ताधाऱ्यांकडून शिवसेनेत घडलेल्या राजकीय घडामोडींना उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अशातच परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (MP Sanjay alias Bandu Jadhav) यांनी देखील या परिस्थितीला उद्धव ठाकरेंना जबाबदार धरत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते. त्यांनी कुणाकडे तरी पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे होतं, असं वक्तव्य खासदार संजय (बंडू) जाधव यांनी केलं आहे. दोघंही मंत्री झाल्याने पक्ष संघटनेकडे लक्ष देता आले नाही आणि गद्दारांना संधी मिळाली. तुम्ही खुर्ची आटवल्याने त्यांना वाटलं की, उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्याच्यापेक्षा वेगळी चुल मांडली, तर काय बिघडलं? आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाच घरचा आहेर दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रा सुरु आहे. याद्वारे शिवसेनेचे नेते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. शिवगर्जना सभेत बोलताना खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे चुकले असे स्पष्टपणे सांगत नाराजी व्यक्त केली आहे.

ED Raid : ईडीविरोधात हसन मुश्रीफांनी दंड थोपटले…

बंडू जाधव म्हणाले, महाविकास आघाडीची सत्ता असताना अडीच वर्षे आमचा जो लाभ व्हायला हवा होता तो झाला नाही. तो काळ असाच गेला. एक सत्तेचा भाग जो आपल्याला मिळायला हवा होता तो मिळाला नाही याचे दु:ख होते, असंही ते म्हणाले. ही वस्तुस्थिती आहे, मी केवळ त्यावर बोलत आहे. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी पक्ष संघटनेला वेळ द्यायला होता तो दिला नाही म्हणून आमच्यावर ही वेळ ओढावल्याचे जाधव म्हणाले. यामुळेच चोरांना संधी मिळाली असा टोलाही संजय जाधव यांनी शिंदे गटाला लगावला.

Tags

follow us