Download App

Ajitdada बघताय ना, जयंत पाटलांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स !

मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हेच भावी मुख्यमंत्री आहेत, असे राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट म्हणत असतो. कार्यकर्तेही उत्साहाच्या भरात तसे म्हणत असतात. त्यावर खुद्द अजित पवार यांनीच मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका, असे एकदा बारामती येथील कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर आता असाच प्रकार राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत घडला आहे.

जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील (Mumbai) मलबार हिल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शुभेच्छा फलक लावले आहेत. पाटील यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर काही पोस्टर्स झळकले आहेत. या फलकांद्वारे पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचवेळी पाटील यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून करण्यात आला आहे. शहरात अनेक ठिकाणी जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. या फलकांमध्ये मात्र जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाषणात अजितदादांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले होते. फक्त व्यासपीठावर न बोलता अजितदादांचं काम घराघरात पोहोचवायचं आहे. येत्या वर्षभरात हे आपल्याला करायचे आहे. कारण, पुढील वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे लंके यांनी म्हटलं होतं. मात्र, आधीच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या अजित पवारांनंतर जयंत पाटलांच्या नावाचीही चर्चा आता सुरू झालीी आहे.

मुळात माजी मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठे नाव आहे. त्यांचे पक्षातील स्थानही बळकट आहे. अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि विधानसभेत पक्षाचे गटनेचे सुद्धा आहेत. राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यामुळेच पक्षातील काही आमदार, पदाधिकारी त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतात. अशा परिस्थितीत आता कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या वाढदिवसाचे टायमिंग साधत त्यांना शुभेच्छा देताना राज्याचे भावी मुख्यमंत्री संबोधले आहे. यानंतर आता पक्षांतर्गत तसेच राजकारणात काय प्रतिक्रिया उमटतात तसेच अजित पवार यांच्याप्रमाणेच जयंत पाटील सुद्धा कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us