Jayant Patil : राज्य मंत्रिमंडळाची आज छत्रपती संभाजीनगरात कॅबिनेट बैठक होत आहे. मराठावाडा मुक्ती संग्रामाचे औचित्य साधत त्यानिमित्त ही बैठक मराठवाड्यात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे विरोधकांचेही लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही या बैठकीवर भाष्य केले आहे.
जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी या बैठकीसंदर्भात भाष्य केले आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलं त्या पार्श्वभुमीवर आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे. पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरित्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. पुढील पिढी शेती करणार का, इतका गंभीर प्रश्न आहे. शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे मराठवाड्यात सर्वाधिक आहे. गेल्या काही महिन्यात बीड जिल्ह्यात 186 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारनं गंभीरपणे पहायला हवं.
मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलंय त्या पार्श्वभूमीवर आजची राज्यमंत्रीमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे.
पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 16, 2023
इतर राज्यात, जिल्ह्यांत कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत इथल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. छत्रपती संभाजीनगरला विमानतळ अशी पाटी आहे. पण विमान येतच नाही. दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं रुप दिले आहे. अति उत्साहात सरकार सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमांतून ऐकली. त्याचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो, असे पाटील (Jayant Patil) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 140 रूम्स आलिशान हॉटेलमध्ये बुक करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार होते त्याचे भाडे 32 हजार रूपये असून या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून ‘सुभेदारी’ थाट करण्यात आला होता. याशिवाय मंत्री, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांच्या दिमतीला 300 गाड्यांचा ताफा ठेवण्यात आला होता. राज्यातील नागरिक आणि शेतकरी दुष्काळाच्या संकटाला तोंड देत असताना एका बैठकीसाठी होत असलेला कोट्यावधींचा खर्च पाहून विरोधकांचा पारा चढला. त्यांनी सरकारवर तुफान टीका सुरू केली. मग, सरकारलाही आपलं कुठेतरी चुकतंय, जनतेचा रोषही वाढू शकतो याचा अंदाज आल्याने माघार घेतली. फाइव्ह स्टार हॉटेलात राहण्याचा निर्णयच बदलला.
Sanjay Raut : टीका केल्यावर ‘सुभेदार’ सुभेदारीवर चालले; मुक्काम बदलल्यानंतर राऊतांची शिंदेंवर टीका