Karnataka Election Results : कर्नाटकच्या नागरिकांनी यंदा भाजपला नाकारत (Karnataka Election Results) काँग्रेसच्या हातात कारभार दिला आहे. ताज्या माहितीनुसार काँग्रेसने 119 जागांवर विजय मिळवला असून 17 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला फक्त 64 जागा मिळाल्या असून 9 जागांवर आघाडी घेतली आहे.
काँग्रेसच्या विजयानंतर देशभरातील विरोधकांनी भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपबाबत मोठं भाकित केलं आहे.
बनर्जी म्हणाल्या, मी कर्नाटकच्या मतदारांना सलाम करते. तसेच निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारांनाही मी सलाम करते. एच. डी. कुमारस्वामी यांनीही चांगली कामगिरी केली. आता छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका येत आहेत. मला वाटतं आता भाजपाचा या दोन्ही राज्यात पराभव होईल. ही 2024 ची सुरुवात आहे. भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत 100 जागा मिळतील असेही आता वाटत नाही.
#WATCH | #KarnatakaElectionResults | "I salute the people of Karnataka, all the voters. I also salute the winners for their victory. Even Kumaraswamy did well. Chhattisgarh and Madhya Pradesh elections are coming, and I think BJP will lose both elections. This is the beginning of… pic.twitter.com/2CFrn8Sf7w
— ANI (@ANI) May 13, 2023
कर्नाटकात यंदा काँग्रेसने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. भाजपने सत्ता राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. मतदानानंतर आलेल्या अंंदाजात काही ठिकाणी भाजपला 80 पर्यंत जागा मिळतील असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त 64 जागा पक्षाला मिळाल्या आहेत. निवडणुकीच्या आधी घेतलेले काही निर्णय, विद्यमान आमदारांचे कापलेले तिकीट, पक्षात उफाळून आलेली बंडखोरी, पक्षांतर यांसह अन्य कारणांमुळे दक्षिणेतील मोठे आणि भाजपकडे असलेले एकमेव राज्यही गेले.
दरम्यान, आता काँग्रेसही सतर्क असून कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेत आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावून घेतले आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याचेही समजते. यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. अजून पूर्ण निकाल हाती आलेले नाहीत. त्यामुळे चित्र अजून स्पष्ट नाही. मात्र सध्याच्या स्थितीवरून तरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचे दिसून येत आहे.