Download App

बंटी पाटील अन् महाडिकांमध्ये पुन्हा रंगणार कुस्ती; धोबीपछाड कोण देणार याची उत्सुकता

Satej Patil Vs Munna Mahadik :  गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात मोठे फेरबदल झालेले पहायला मिळाले आहेत. गेली अनेक वर्षे ज्यांची कोल्हापूर जिल्ह्यावर एकहाती सत्ता होती, त्या महाडिक कुटूंबाला एकामागून धक्के बसत आहेत. महाडिक कुटूंबाला मागच्या काही वर्षांत अनेक निवडणुकीत पराभवाला सामोर जावे लागले. त्यामुळे महाडिक कुटूंबाचे राजकारण आता संपुष्टात येते का असे म्हणायची वेळ आली होती. पण राज्यसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे धनंजय महाडिक यांच्या राज्यसभा निवडणुकीत विजय झाला. त्यामुळे अनेक वर्षांनंतर महाडिक कुटूंबाच्या अंगावर गुलाल पडला.

या सगळ्यात महाडिक कुटूंबाच्या सत्तेला सुरूंग लावण्याचे काम हे दुसरे-तिसरे कोणी केले नसून त्यांचेच प्रतिस्पर्धी व कोल्हापूरच्या मातीतीलच सतेज उर्फ बंटी पाटलांनी केले आहे. कोल्हापूरला नव्हे तर आख्ख्या महाराष्ट्राला बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक हा संघर्ष माहिती आहे. आता पुन्हा हा संघर्ष पहायला मिळणार आहे. याचे कारण कोल्हापूरच्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत हे दोन्ही गट आपले वर्चस्व दाखवण्याचा जोरदार प्रयत्न करतील. या कारखान्याच्या २१ जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Sharad Pawar… आता सुप्रिया सुळे नॉट रिचेबल आहेत का?

याआधी महाडिक कुटूंबियांचे राजकारण हे देखील तीन पक्षातून चालत होते. महादेवराव महाडिक हे काँग्रेसमध्ये, त्यांचे सुपूत्र अमल महाडिक हे भाजपमध्ये तर धनंजय महाडिक हे त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होते. बंटी पाटील यांनी २०१५ साली सर्वात प्रथम महाडिक कुटूंबाला जोरदार धक्का दिला होता. त्यांनी महादेवराव महाडिकांचा विधान परिषदेमध्ये मानहानीकारक पराभव केला होता. महाडिकांना काँग्रेसकडून मिळालेली सलग १८ वर्षांची विधान परिषदेतली आमदारकी गमवावी लागली होती. याआधी महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव अमल महाडिक यांनी २०१४ साली भाजपकडून निवडणूक लढवत बंटी पाटलांना विधानसभेला आसमान दाखवलं होतं. यानंतरच्या २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत बंटी पाटील यांचे पुतणे ऋतूराज पाटील यांनी अमल महाडिकांचा पराभव करत काकाच्या पराभवाचा वचपा काढला  होता. त्यामुळे या दोन्ही कुटूंबियांमधला संघर्ष हा आणखी तीव्र झाल्याचे पहायला मिळाले.

तसेच २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी उभे होते. तेव्हा ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत बंटी पाटलांनी महाडिकांना धुळ चारली होती.  यानंतर कोल्हापूरच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र मानले जाणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक लागली होती. या निवडणुकीत बंटी पाटलांनी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांना बरोबर घेतले. ‘आमचं ठरलंय, गोकूळ उरलंय’, अशी घोषणा देत महाडिकांना त्यांच्याच मैदानात थेट आव्हान दिले. नुसतं आव्हान देऊन बंटी पाटील थांबले नाही तर त्यांनी गोकूळमध्ये असलेली महाडिक कुटूंबियांची सत्ता उखडून टाकली व विजय मिळवला.

Eknath Shinde Ayodhya Tour : रामाच्या चरणी पापं धुवायला गेलेल्यांना आशिर्वाद मिळत नाही, राऊतांचा शिंदेंना टोला

त्यामुळे आता होऊ घातलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीआधीच सतेज पाटलांना जोरदार धक्का बसला आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र १२२ गावांमध्ये आहे. या कार्यक्षेत्राबाहेरील सभासद अपात्र ठरवण्यासाठी पाटलांनी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना यात अपयश आले. यानंतर अर्ज छाननी करण्याच्या प्रक्रियेमध्ये पाटील गटाचे २९ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच बंटी पाटलांना हा दुसरा धक्का असल्याचे मानले जात आहे. यावरुन कुस्ती लढायची तर मर्दासारखी लढा, असे आव्हान बंटी पाटलांनी महाडिकांना दिले आहे.

दरम्यान, गेल्या तीस वर्षांपासून राजाराम कारखान्यावर महाडिकांची सत्ता आहे. यावेळी महाडिकांकडून निवडणुकीची सगळी सुत्रे ही अमल महा़डिक यांच्या हातात आहेत. जर या निवडणुकीत महाडिकांनी विजय मिळवला तर महाडिक पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व दाखवू शकतात. याऊलट बंटी पाटलांनी या निवडणुकीत जर विजय मिळवला तर राज्यात सत्ता बदल होऊनही कोल्हापूरात बंटी पाटलांचीच हवा आहे, असे म्हटले जाईल.

Tags

follow us