Download App

‘माथाडी चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न, त्याविरुद्ध उभे राहा’; पवारांनी कष्टकऱ्यांना दिलं बळ

Sharad Pawar : आज कारखानदारी वाढली. ती वाढावी यासाठी प्रयत्न केले. कारखानदारी वाढते हाताला काम मिळते चांगली गोष्ट आहे. पण, ते काम देत असताना जो काम करणारा आहे त्याला कायद्याने जे संरक्षण आहे. आज त्या कायद्याच्या संरक्षणावर हल्ल चढवण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे. माथाडी हमाल कायदा हा राज्यात सुरू झाला. त्या कायद्यानं कष्टकऱ्यांना सन्मानानं जगण्याची संधी दिली. पण काही लोक असे आहेत त्यांना हा माथाडी कायदा खूपतोय. गुंडगिरी करून माथाडी चळवळीला बदनाम करतील तर त्या लोकांविरुद्ध तुम्हाला उभं रहावं लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

हमाल माथाडी कामगारांच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबा आढाव, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, आ. निलेश लंके, आ. प्राजक्त तनपुरे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, माजी आमदार दादा कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.

Sharad Pawar : कर्नाटकातील भाजपच्या पराभवाचा दाखला देत शरद पवारांनी फुंकलं संघर्षाचं रणशिंग!

पवार पुढे म्हणाले, काही लोक मला भेटतात म्हणतात या कायद्यानं असं झालं तसं झालं. मी त्यांना विचारतो काय झालं. आज मालक वर्गात मानसिकता तयार झाली ती म्हणजे संपत्ती मिळवायचा आणि ठेवायचा हा अधिकार फक्त आमचा आहे आणि कष्ट करणं हे काम तुमचं आहे. आज एक वेगळं वातावरण समाजात तयार करून काही लोक या मालकांच्या नावाने एक वेगळा निकाल घेत आहेत. तो निकाल त्यांना घ्यायचा असेल तर माथाडी कामगारांवर हल्ला करणं ही भूमिका त्यांच्या मनात आहे.

आज हा कायदा सुखासुखी झालेला नाही.  मी विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेलो. त्यावेळी माझ्याबरोबर अनेक ज्येष्ठ नेते होते. कष्टकरी कामगारांची शक्ती तयार करून कायदा करण्यात आला. त्या कायद्याने तुमच्या जीवनात शाश्वती आली. नंतर सरकार बदललं फडणवीसांचं सरकार आलं त्यांनी काय केलं तर राज्यातील सगळे जिल्ह्यांचं एक नवीन राज्यव्यापी मंडळ स्थापन करण्याची भूमिका घेतली. पण, त्याला विरोध झाला.

गुंडगिरी करून माथाडी चळवळीला बदनाम करतील तर त्या लोकांविरुद्ध तुम्हाला उभं राहावं लागेल. आज माथाडी चळवळीला बदनाम करण्याचे प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहेत. त्याविरुद्ध उभं राहणं आणि सर्वसामान्य कष्टकरी कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेण्यासाठी सर्वांची एकजूट गरजेची आहे, असे पवार म्हणाले.

9 Years of Modi Government : मोदींच्या ‘या’ 9 वक्तव्यांनी झाला होता देशभरात हंगामा

Tags

follow us