Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथून जाहीर केला. त्यानंतर जिल्हा विभाजनाच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता जिल्हा विभाजनाच्याही हालचाली सुरू होतील असे वाटत असतानाच आज सरकारने मोठा निर्णय घेत झटका दिला आहे. राज्य सरकारने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ असा की आता जिल्हा विभाजन लांबणीवर पडले आहे किंवा जिल्ह्याचे विभाजन करायचे असा कोणताच हेतू सरकारचा नाही असे या निर्णयातून स्पष्ट होत आहे.
अहमदनगरचे नाव ‘अहिल्यानगर’, ‘अहिल्यादेवीनगर’ की ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ होणार हे सरकार दरबारी निश्चित होणार आहे. अहमदनगर जिल्हा राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वात मोठा आहे. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या कामकाज करण्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्याचा जनतेलाही फटका बसतो. त्यामुळे नगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचे मागणी ही तब्बल चाळीस वर्षांपूर्वीची आहे. जिल्ह्यातील उत्तर भागाचा एक जिल्हा आणि दक्षिण भागाचा एक जिल्हा करण्याची मागणी आहे. जिल्ह्याच्या नामांतराची मागणी खऱ्या अर्थाने वर्षाभरापूर्वीची आहे. ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच मार्गी लावली होती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे सत्ता राज्यात असताना जिल्हा विभाजनाबाबत मात्र निर्णय घेण्यात आला नव्हता.
जिल्हा विभाजनासाठी राम शिंदे आग्रही
आमदार राम शिंदे (Ram Shinde) हे नगरचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्याच्या विभाजनाबाबत तेही आग्रही होते. उत्तरेतील जिल्ह्यातील मुख्यालय कोणता याचाही वाद आहे. संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी असे तीन नावे मुख्यालयासाठी चर्चेत येतात. राजकीय वादामुळेही हा प्रश्न सुटत नाही, असे येथील जाणकार सांगतात.
.. म्हणून शिंदे-फडणवीसांनी टाळलं जिल्हा विभाजन?
आता मात्र सरकारने शिर्डीला अप्पर जिल्हाधिकाऱ्याचे पद निर्माण करून जिल्हा विभाजनाचा विषयच निकाली काढल्याचे बोलले जात आहे. तसेही जिल्हा विभाजन झाले असते तर जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे राजकारण धोक्यात आले असते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांना याचा मोठा फटका बसला असता. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्यांचे मतांचे गणित बिघडले असते. जिल्हा मुख्यालयाचा वादही अनेक वर्षे धुमसत राहिला असता. या काही शक्यता पाहता शिंदे फडणवीस सरकारने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी पद निर्माण करत जिल्हा विभाजनाचा मुद्दा तुर्तास बाजूला ठेवल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादीकडून जिल्हा विभाजनाला धार! जगताप म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा विभाजनाचा…
जिल्हा विभाजनाला राष्ट्रवादीने दिली धार
नामांतराचा मुद्दा महत्वाचा आहे. नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. मात्र, भविष्यात कधीतरी जिल्हा विभाजन ज्यावेळी होईल. त्यावेळी जिल्ह्याचे नाव काय किंवा त्या जिल्ह्याचे नाव काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नामांतर घोषित करतानाच जिल्हा विभाजन घोषित केले असते तर जास्त आनंद झाला असता, असे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी नगर जिल्ह्याचे नामांतराची घोषणा केल्यानंतर म्हटले होते.