Download App

Maharashtra Assembly Bypoll : कसब्यासाठी शैलेश टिळक, चिंचवडसाठी अश्विनी जगतापांचे नाव आघाडीवर

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Bypoll पुण्यातील कसबा पेठ (kasabha) आणि चिंचवड (chinchwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (bypoll) तारखा निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या आहेत. 27 फेब्रुवारी रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते. त्यामुळे येथे कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांचे नाव आघाडीवर आहे. जर त्यांनी उमेदवारी नाकारली तर त्यांची मुलगी ऐश्वर्या जगताप- रेणुसे हिच्या नावाचा विचार होऊ शकतो. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचेही नाव कुटुंबातील सदस्य म्हणून संभाव्य उमेदवारीसाठी घेतले जात आहे.

पण राजकीय वर्तुळातील माहितीनुसार आश्विनी जगताप यांच्याच उमेदवारीची शक्यता सर्वाधिक आहे. त्यांचे नावसमोर आल्यास इतर राजकीय पक्ष आपले उमेदवार देण्याचे टाळतील आणि त्या बिनविरोध येऊ शकतील असे बोलले जात आहे.

विद्यमान आमदाराचे निधन झाल्यानंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्याची परंपरा दिसून आली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व येथे नुकत्याच झालेल्या झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी यांना पक्षाने उमेदवारी दिली होती.

यावेळी इतर प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार मागे घेतले होते. त्यामुळे कोणत्याही चुरशीचा लवलेश या ठिकाणी नव्हता. त्याचाच कित्ता चिंचवड आणि कसबा या मतदारसंघात गिरवला जाण्याची शक्यता आहे.

जगताप कुटुंबीयांचे सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्याने येथे कोणताही पक्ष आपला अधिकृत उमेदवार देणार असल्याची शक्यता कमी आहे. भाजपमधूनही या जागेवर तातडीने कोणी दावा करेल याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे

कसबा मतदारसंघात मात्र थोडी वेगळी स्थिती आहे. कसबा मतदारसंघात भाजपमध्ये चुरस आहे. त्यामुळे येथे सर्व सहमतीचा उमेदवार निवडणे भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकणार आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट किंवा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने हे देखील या मतदारसंघातून इच्छुक असू शकतात. उमेदवारीवर एकमत न झाल्यास मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांना उमेदवारी जाऊ शकते असाही स्वर आहे.

गिरीश बापट हे प्रकृती अस्वास्थामुळे 2024 लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांच्या घरातील सदस्याला राजकीय संधी देण्याचे सूत्र येथे साधले जाऊ शकते.

2019 मध्ये तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांना लोकसभेचे उमेदवारी नाकारून त्यांचे पुत्र सिद्धार्थ यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. तसेच सूत्र बापट यांच्यासाठी राबवणार का हे पण या निवडणुकीत दिसून येईल. परंतु निवडणूक बिनविरोध करायचे असल्यास आणि सर्व सहमतीचा उमेदवार म्हणून कोणाला संधी द्यायची तर शैलेश टिळक यांचे नाव अग्रभागी राहण्याची जास्त शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांना आपण या मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी तयार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. पक्षातून त्यांना कानपिचक्या देण्यात आल्या. टिळक यांच्याच घरातील कोणी उमेदवार दिल्यास इतर राजकीय पक्ष ही अधिकृत उमेदवार करण्याची शक्यता नसल्याने भाजपदेखील तोच पर्याय निवडेल असे बोलले जाते आहे.

या आमदारकीची मुदत केवळ दीड वर्षांची आहे. त्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणूक झाल्यास नव्याने निवडून येणाऱ्या आमदाराला फक्त एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षही फार चुरशीने या दोन्ही निवडणुका लढवतील याची शक्यता कमी आहे.

Tags

follow us