Maharashtra Kesari 2026 : पुण्यातील वाघोलीत 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दमदार सुरुवात झालीय. प्रतिष्ठेच्या संबोधल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या चित्त थरारक लढतींनी उपस्थित हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजले जाणाऱ्या सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने माती विभागातील पहिल्या फेरीत सोलापूरच्याच विशाल बनकरचा 6-1 असा पराभव करून विजय घोडदौड सुरू केली. तर अमरावतीच्या ज्ञानेश्वर जमदाडेला पराभवाचा धक्का बसला. तर, सिकंदर शेख, शिवराज राक्षे, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची आगेकूच झाली आहे.
दुसऱ्या लढतीत उंच व धिप्पाड देहाच्या अमरावतीच्या ज्ञानेश्वर जमदाडे याला कमी उंचीच्या व महाराष्ट्रातील कुस्तीत चपळ चित्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या बाळू बोडके याने अत्यंत चुरशीच्या लढतीत 10-0 अशा गुणाधिक्याने पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तसेच संपूर्ण भारतात आपल्या कुस्ती कौशल्याने धुमाकूळ घालणाऱ्या हिंगोलीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सिकंदर शेखने पहिल्या फेरीत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत पुण्याच्या अनिकेत मांगडेचा 8-1 अशा गुणाधिक्याने पराभव करून पुढच्या फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेने ठाण्याच्या कुमार पाटीलचा 6-0, सोलापूरच्या रविराज चव्हाणने कोल्हापूरच्या तेजस मोरेचा 12-0, रत्नागिरीच्या संतोष दोरवडने पिंपरी चिंचवडच्या समाधान दगडेचा 10-0, पुण्याच्या सागर देवकातेने यवतमाळच्या शुभम जाधवला चितपट केले. तर पुणे शहराच्या मनिष रायतेचा प्रतिस्पर्धक मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा भारत मदने गैरहजर राहिल्याने थेट पुढच्या फेरीत प्रवेश केला. अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरने पालघरच्या सुबोध पाटीलचा 5-0 अशा गुण फरकाने पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.
गादी विभागातील पहिल्या फेरीत मूळचा पुण्याचा परंतु वाईल्ड कार्डच्या माध्यमातून नांदेडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवराज राक्षे याने पुण्याच्या प्रतिक जगतापचा 10-0 अशा गुणाधिक्याने पराभव करून विजय सलामी दिली. तसेच कोल्हापूरच्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने पालघरच्या वैभव मानेचा 10-0, तर नाशिकच्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने मूळचा पुण्याचा परंतु बीडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिक देशमुखचा 10-0 तर गतवेळच्या महाराष्ट्र केसरी पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पृथ्वीराज मोहोळ याने जालन्याच्या अरुण चरावडेचा 10-0 अशा गुणाधिक्याने पराभव करून विजय सलामी देत विजयी घोडदौड सुरू ठेवली. गडचिरोलीच्या संग्राम पाटीलने वाशिमच्या आदित्य मोहोळचा 7-3, साताऱ्याच्या दिग्विजय जाधवने जळगावच्या स्वप्नील पाटीलला चितपट केले. तर पुणे शहराच्या श्रेयस होळकरने कोल्हापूरच्या ओंकार पाटीलचा 11-0 असा पराभव करून पुढच्या फेरीत दिमाखात प्रवेश केला.
