Sanjay Raut on RSS : हेमंत करकरे यांना लागलेली गोळी दहशतवादी अजमल कसाबची नाही तर आरएसएस समर्पित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठली. महाविकास आघाडीही बॅकफूटवर गेली असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष सुरू होता. संघाचे लोक माझ्याकडे यायचे असा दावा, संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गट, भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.
‘नाशकात भूसंपादनाच्या नावाखाली कोट्यावधींचा घोटाळा, दोन दिवसांत खुलासा करू’ : संजय राऊत
या प्रकरणात साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना अटक केली होती. त्या केसचा अभ्यास केला. त्यावेळी संघाचे लोक माझ्याकडे यायचे आणि हेमंत करकरेंनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचे मला सांगायचे. कर्नल पुरोहित यांचे कुटुंबियही माझ्याकडे यायचे. पण यात विजय वडेट्टीवार यांचं नाव का घेतलं जात आहे असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
राऊत पुढे म्हणाले हू किल्ड करकरे हे पुस्तक वाचा. हे पुस्तक एसएम मुश्रीफ यांनी लिहिलं आहे. कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा आरएसएसचे लाडके होते. त्यांना अटक झाल्यामुळे संघ आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष सुरू होता असा दावा संजय राऊतांनी केला. त्यांच्या या वक्तव्यार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.