Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी आजही कोणीच विसरलं नाही. त्यातच आता दुपारचा शपथविधी होत आहे. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये पुन्हा बंड पुकारलं आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शिंदे सरकारने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीतील 8 आमदारही शपथबद्ध झाले. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारचा शपथविधी गाजला आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अजितदादा राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशात आज अजित पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह शपथविधी झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अन्य 8 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेचे अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. मात्र तो शपथविधी राजकीय वर्तुळात अद्यापही चर्चेत असतो. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. हे सरकार तसं अत्यल्प काळ टिकलं पण तरी देखील या सरकारला आजही कोणी विसरलं नाही. त्यातच आता अजित पवार यांनी राष्ट्रावादीमधील बहुतेक आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनात दाखल झाले. त्यामुळे आता सकाळच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथविधी गाजणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, नरहरी झिरवळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते, त्यानंतर आता हे सर्व आमदार राजभवनामध्ये होणाऱ्या शपथविधीला उपस्थित होते.