Ambadas Danve :ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा हवाला देत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर ठाकरे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
या मुद्द्यावर आधीच शिरसाट आणि माजी खासदार खैरे यांच्यात जोरदार वाद सुरू होते. त्यात आता दानवेंनी उडी घेतली आहे. मंत्रीपद नसल्याने हा माणूस बिथरला आहे. त्याला काय बोलायचं हे सुद्धा समजत नाही. हल्ली फक्त ठाकरे घराण्यावर टीका हीच आपली दुकानदारी आहे. एव्हाना राजकारणी म्हणून नीच आहातच पण, आता माणूस म्हणून तुम्ही हीच लंपट भूमिका वठवताय, अशा शब्दांत दानवे यांनी शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केला.
संभाजी भिडेवर कारवाई का होत नाही? काँग्रेस नेत्यानं दिलं धक्कादायक उत्तर
याआधी खासदार चतुर्वेदी यांनी ठाण्यातील हिंदी भाषकांच्या मेळाव्यात शिंदे गटावर जळजळीत टीका केली होती. त्याला शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले होते. प्रियांका चतु्र्वेदी यांचे सौंदर्य पाहून खासदारकी दिली होती, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर ठाकरे गटातील नेते चांगलेच भडकले आहेत.
ठाण्यात हिंदी भाषिक कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी(Priyanka Chaturvedi) यांनी शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करीत सडकून टीका केली होती. त्यावरुन संजय शिरसाटांनीही खासदार चतुर्वेदी यांना खासदारकी कशी मिळाली? त्याबद्दल थेट भाष्य करीत जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता खासदार चतुर्वेदी यांनीही ट्विटरद्वारे शिरसाटांना खोचक प्रत्युत्तर दिलं. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नसल्याचा टोलाच चतुर्वेदी यांनी शिरसाटांना लगावला.