Maharashtra Politics : राजकारणात अनिश्चितता जास्त असते. कधी कुणाचं सरकार पडेल अन् कुणाची खुर्ची जाईल याचा काहीज अंदाज नसतो. पण हेच राजकारण काही जणांना चांगलंच लकी ठरतं. आताही विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा चर्चेत आलाय. येत्या 27 मार्चला विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. यात उमेदवारी मिळालेले नेते कधीकाळी मंत्र्यांचे पीए राहिले आहेत. आता हेच पीए आमदार होतील. पण मंत्र्यांचे स्वीय सहायक आमदार होणं ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. थोडं इतिहासात डोकावून पाहिलं तर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यापासून अलीकडचे मिलींद नार्वेकर असे अनेक पीए आमदार आणि मंत्री देखील झालेत. याच निमित्ताने पीएपासून आमदार झालेल्या काही नेत्यांची माहिती घेऊ..
मोठी बातमी! विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध ; अपक्ष उमेश म्हात्रेंचा अर्ज बाद
पीए म्हणून करिअरला सुरुवात केली आणि काही काळातच थेट आमदार झाले याचं पहिलं उदाहरण म्हणून ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाहता येईल. दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पीए होते. शरद पवार यांनीच नंतर त्यांना राजकारणात आणलं. आमदार, मंत्री ते थेट विधानसभेचा अध्यक्ष होण्यापर्यंत वळसे पाटलांचा आलेख वाढत गेला. आज दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत. येथेही पक्षातील ज्येष्ठ अन् अनुभवी नेते म्हणूनच ते ओळखले जातात.
यानंतर आणखी एका नेत्याचं नाव घ्यावं लागेल. ते म्हणजे आमदार अमित साटम. खरंतर अमित साटम यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले होते. पुढील काळात साटम यांनीही राजकारणात पदार्पण केले. मुंबई भाजपाचे महत्वाचे नेते म्हणून अमित साटम यांच्याकडे पाहिले जाते. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून साटम यांनी तीनदा विजय मिळवला. आज अमित साटम राजकारणात चांगलेच स्थिरस्थावर झाले आहेत.
सुबोध मोहिते हे देखील राज्य सरकारमध्ये अधिकारी होते. पहिल्या युती सरकारच्या काळातील मंत्री महादेव शिवणकर यांचे पीए म्हणून त्यांनी काम पाहिले होते. याच काळात त्यांनी राजकारणाचे बारकावे समजून घेण्यास सुरुवात केली होती. शिवणकर यांचा भाजपातील काही नेत्यांशी वाद झाला होता. त्यांनी तर बंडाचीही तयारी केली होती. पण मोहिते यांच्या टीपमुळे हे बंड फसल्याचे सांगितले जाते. यानंतर मात्र मोहिते यांनी सरकारी नोकरीच सोडली. पुढे भाजप नेते नितीन गडकरी यांच्या इच्छेनुसार त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
आता दरवर्षी घोषित केला जाणार ‘बेस्ट आमदार ऑफ द इअर’; विधानसभा अध्यक्षांची घोषणा
शिवसेनेच्या तिकीटावर रामटेक मतदारसंघातून त्यांनी नशीब आजमावलं. एकदा नव्हे तर दोनदा खासदारही झाले. पुढे राजकारणातील समीकरणे बदलली आणि नारायण राणे यांच्या नेतृत्वात सुबोध मोहिते यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आजमितीस भाजपातील एक आक्रमक चेहरा म्हणून आमदार राम कदम ओळखले जातात. टिव्ही डिबेटमध्ये पक्षाची भूमिका अगदी हिरीरीने मांडताना तुम्ही त्यांना पाहिलच असेल. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की राम कदम कधीकाळी भाजप नेते स्व. प्रमोद महाजन यांचे पीए होते. स्वीय सहायकाचं काम सांभाळत कदम यांनी मुंबईच्या राजकारणात स्वतःचं वजन निर्माण केलं. 1999 पर्यंत राम कदम महाजन यांचे पीए होते.
नंतरच्या काळात राम कदम यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. पण भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांना भाजप सोडावे लागले. नंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला. 2009 मध्ये आमदार झाले. पण राजकारणात काहीच निश्चित नसतं. राम कदम यांचं मन मनसेत फार काळ रमलं नाही. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा घरवापसी केली. कदम भाजपात दाखल झाले आणि आज राम कदम भाजप आमदार आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिलींद नार्वेकर यांचं नाव सतत चर्चेत राहायचं. मिलींद नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक. साधा शिवसैनिक ते ठाकरेंचे पीए अशी त्यांची कारकीर्द आहे. आता यात आणखी एक टप्पा जोडला गेलाय. राजकारणाच्या बाहेर तर उद्धव ठाकरेंनी त्यांना भरभरुन दिलंच पण नंतर त्यांना आमदारही करुन दाखवलं. मिलींद नार्वेकर आज विधानपरिषदेचे आमदार आहेत. सर्व पक्षांत त्यांचा चांगला संपर्क आहे. याचाच त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत फायदा झाला.
येत्या 27 मार्च रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने संजय खोडके यांना तिकीट दिलंय. संजय खोडके आधी मंत्रालयात नोकरीला होते. उपमुख्यमंत्री असताना छगन भुजबळ स्व. आर. आर. पाटील यांचे ते स्वीय सहायक आणि विशेष कार्य अधिकारी होते. त्यामुळे खोडके यांचे राजकारण आणि जनसंपर्क दांडगा होता. याच बळावर त्यांनी पत्नी सुलभा खोडके यांना आमदार केलं होतं. आता खोडके यांची आमदारकी देखील पक्की आहे.
Video: स्पर्धा परिक्षांबाबत फडणवीस यांची मोठी घोषणा; यावर्षीपासून MPSC डिस्क्रीप्टिव्ह होणार
महाराष्ट्र भाजपात सर्वात शक्तीशाली नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. 2014 मध्ये मुख्यमंत्री, नंतर उपमु्ख्यमंत्री आता पुन्हा मुख्यमंत्री अशी फडणवीसांची वाटचाल आहे. या काळात त्यांनी असंख्य सहकारी जोडले. पण त्यांचे म्हणून काम पाहणारे काही जण खरे भाग्यवान ठरले. यात पहिलं नाव येतं अभिमन्यू पवार यांचं.
लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. अभिमन्यू पवार फडणवीसांचे स्वीय सचिव होते. यानंतर फडणवीसांचे पीए म्हणून सर्वाधिक चर्चिले गेलेले नाव म्हणजे सुमित वानखेडे. सुमित वानखेडे यांना आर्वी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आणि नाराजीचा भडका उडाला. खरंतर दादाराव केचे यांचं तिकीट कापून वानखडेंना उमेदवारी देण्यात आली होती. संतप्त झालेल्या केचे यांनी बंडखोरीचा झेंडा उभा केला. ही संभाव्य बंडखोरी अडचणीची ठरू शकते याचा अंदाज आल्याने केचे यांना थेट अमित शाह यांच्यासमोर हजर करण्यात आले.
केचेंना विधानपरिषदेचा शब्द मिळाला. त्यांचे बंड शांत झाले. यंदाच्या विधानपरिषदेत केचेंना संधी देत भाजप श्रेष्ठींनी शब्द खरा करुन दाखवला. या एकाच घटनेने सुमित वानखेडे यांची ताकद अधोरेखित झाली. वानखेडे आमदार झाले. श्रीकांत भारतीय गेल्या वर्षी विधानपरिषदेवर निवडून आले. फडणवीस 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयात भारतीय यांची ओएसडी म्हणून नेमणूक झाल्याचे भाजप नेते अविनाश देव सांगतात.
आता 27 मार्च रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने संदीप जोशी यांना तिकीट दिले आहे. संदीप जोशी फडणवीसांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. सुमित वानखेडे सक्रिय राजकारणात आल्यानंतर जोशी हेच फडणवीस यांच्या कार्यालयात ओएसडी म्हणून नियुक्त झाल्याचे सांगितले जाते. संदीप जोशी यांचीही आमदारकी निश्चित मानली जात आहे.