Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यात गेल्या महिन्यात बैठकांवर बैठक झाल्या. त्यामुळं पवार काका-पुतणे पुन्हा एकदा एकत्र येणार का? याचीच सर्वांना उत्सुकता लागलीय. अशातच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत पवारांनी दिलेत. आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत, त्यातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतं, असं विधान पवारांनी केलं.
शरद पवारांनी नुकतीच इंडियन एक्स्प्रेसला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. याच मुलाखतीत पवारांनी आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं विधान केलं. एका गटाला वाटतं की आम्ही एकत्र यावं, अजित पवारांसोबत जावं असं वाटतं. तर दुसऱ्या गटाला वाटतं की, अजितदादांसोबत जाऊ नये, असं पवार म्हणाले. इतकंच नाही तर संसदेमध्ये सत्ताधारी पक्षासोबत बसायचं की, विरोधी पक्षासोबत बसायचं यांचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा, असं सूचक वक्तव्यही पवारांनी केलं. पवारांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
जनतेला मोदींना पर्याय हवा आहे, पण विरोधक तो देऊ शकलेले नाहीत, असंही म्हणत पवारांनी एक प्रकारे इंडिया आघाडीच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उभा केला. दरम्यान, शरद पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्यात.
यापूर्वी विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवारांच्या अनेक आमदारांनी अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच अनेकदा अनेक कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र आल्याचंही पाहायला मिळालं होतं. काही वेळाला त्यांच्यात गुप्त बैठकाही झाल्या होत्या. या भेटी एकप्रकारे राजकीय जवळीक वाढवण्याचे संकेत देतात.
अशातच पक्षातल्या एका गटाला अजितदादांसोबत जावं असं वाटतं असं विधान पवारांनी केलं. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
Operation Sindoor : हुजूर अब बख्श दीजिए! ऑपरेशन सिंदूरचा दणका बसताच पाकिस्तान वठणीवर
काका-पुतणे एकत्र येणार का?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2023 मध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर रोहित पवारांनी अनेकदा महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व कुटुंबांनी एकत्र यावे, असं आवाहान केलं होतं. त्यामुळं आता आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी, पक्षाची एकसंध शक्ती परत मिळवण्यासाठी आणि राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी अजित पवार शरद पवारांना सोबत घेऊ शकतात.
अजित पवार यांच्या गटाकडे मोठा आमदारांचा पाठिंबा आहे, तर शरद पवार यांच्याकडे पक्षाचा पारंपरिक मतदारवर्ग आहे. शिवाय, त्यांचा राष्ट्रीय स्तरावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळं काका-पुतणे एकत्र आल्यास पक्ष पुन्हा एकसंध होऊन आगामी निवडणुकांमध्ये अधिक यश मिळवू शकतो.
महत्वाचं म्हणजे, अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी कधीही वैयक्तिक वैर नसल्याचे दर्शवलं. त्यांच्या गाठी-भेटी, बैठका आणि शुभेच्छा देण्याच्या प्रसंगांमधून हे वेळोवेळी स्पष्ट झालं. त्यामुळं राजकीय मतभेद बाजूला ठेवून शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राजकीय जाणकार सांगतात.थोडक्यात, महाराष्ट्राच्या हितासाठी, पक्षाची एकजूट आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे पवार काका-पुतण्या काय निर्णय घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.