Sudhir Mungantiwar on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लवकरच महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतील. ते महाराष्ट्र दौऱ्यावर येत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर भाजपकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काल राहुल गांधींना इशारा दिला होता.
राहुल गांधींनी आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी नंतर महाराष्ट्रात पाऊल ठेवावं असे बावनकुळे म्हणाले होते. त्यांच्या या इशाऱ्यानंतर काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राहुल गांधींच्या केसाला जरी धक्का लागली तरी यांची काय हालत होतेय ते पहा, असा इशारा दिला होता.
यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र वेगळेच वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘राहुल गांधींच्या दौऱ्याला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. भाजप कशाला विरोध करेल ? भाजपने नेहमीत लोकशाही परंपरा कायम ठेवल्या आहेत. त्यांनी मात्र आणीबाणी लादून लोकांना तुरुंगात टाकलं होतं. राहुल गांधींनी महाराष्ट्रात यावं, आम्ही विरोध करण्याचा प्रश्न कुठेच येत नाही. आमचा पक्ष हा लोकशाहीचा सन्मान करणारा पक्ष आहे.’
पटोले काय म्हणाले ?
‘राहुल गांधी यांचा मुंबई, महाराष्ट्रातील दौरा अद्याप नक्की झालेला नाही परंतु ते लवकरच महाराष्ट्राला भेट देतील. राहुल गांधी यांना महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पक्षातही काही किंमत नाही, ते राहुल गांधींना काय रोखणार?.’
‘भाजपाच्या नेत्यांना राहुल गांधींवर बोलल्याशिवाय झोप लागत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला चोख उत्तर देऊ शकणारे देशात आज राहुल गांधी हेच एकमेव नेते आहेत. राहुल गांधींना भाजप व मोदी घाबरतात म्हणून तर डझनभर मंत्री दररोज त्यांच्यावर टीका करत असतात.’