नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता १० जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबर महिन्यामध्ये दोनदा लांबणीवर पडली होती. तर डिसेंबर महिन्यात हिवाळी सुट्टी असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज होऊ शकले नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ठाकरे गट व शिंदे गटाकडून विविध याचिका दाखल आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठासमोर या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही बाजुंना सुनावणीसाठीचे महत्वाचे मुद्दे परस्परांच्या चर्चेनंतर सादर करण्याचे निर्देश दिले होते.
पण ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी याप्रकरणाची सुनावणी सात सदस्यांच्या घटनापीठापुढे घ्यावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर सरन्यायाधीशांनी दोन्ही बाजूंना या मुद्द्यावर लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर मुख्यमंत्री शिंदे गटाचे वकील निरज किशन कौल, राज्यपालांची बाजू मांडणारे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनीदेखील सहमती दर्शविली आहे. त्यामुळे १० जानेवारी रोजी प्रथम प्रकरणाची सुनावणी सात सदस्यीय घटनापीठासमोर करायची की नाही, याविषयी युक्तिवाद होऊन निर्देश येण्याची शक्यता आहे.